मुंबई- केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह रविवारी रात्री मुंबईत पोहोचले. आज ते लालबागच्या गणपतीचे आणि नंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणरायाचे दर्शन घेतील. तेथून अमित शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यातील गणरायाचे दर्शन घेतील आणि मेघदूत बंगल्यात भाजपा प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करतील.
अमित शाह सध्या सह्याद्री अतिथीगृहावर आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. तसेच थोड्याच वेळात अमित शाह लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी रवाना होणार आहे. लालबाग परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. स्पेशल ब्रांचचे अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, सोबतच काही अधिकारी देखील तैनात करण्यात आले आहेत. मात्र लालबागला जाण्याआधी अमित शाह यांनी मराठीतून एक ट्विट केलं आहे.
गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन. शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल, असं अमित शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कोअर कमिटीचे सदस्य बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर वर्षा बंगल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचे दर्शन घेतील आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. त्यानंतर ते पवईला रवाना होतील. तिथे आयोजित ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन करतील आणि नंतर दिल्लीला रवाना होणार आहेत.