मुंबई : मुंबईसारख्या शहरात एमबीए असलेल्या तरुणाला केवळ अल्पसंख्याक असल्याने नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी तरुणाने केलेल्या तक्रारीनंतर विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झिशान अली अहमद खान (२२) हा कुर्ला येथे आपल्या कुटुंबीयांसोबत राहतो. नोकरीच्या शोधात असलेल्या झिशानला १९ मे रोजी वांद्रे येथील हरिकृष्ण एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मार्केटिंग विभागात जागा रिक्त असल्याचे त्याला समजले. त्यानुसार कंपनीच्या ई-मेल आयडीवर त्याने बायोडेटा मेल केला. त्यावर अवघ्या १५ ते २० मिनिटांत कंपनीच्या व्यवस्थापनाने आम्ही केवळ बिगर मुस्लिमांनाच नोकरी देतो, असे उत्तर देण्यात आले. कंपनीच्या या उत्तराने झिशानने डोक्यालाच हात लावला. याबाबत त्याने कुटुंबीयांना कळविले असता, त्यांनाही धक्का बसला. ही बाब सोशल मीडियावरही शेअर झाली. सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताच झिशानने या प्रकरणी विनोबा भावे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. झिशानच्या तक्रारीवरुन कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसमावेशक विकासाबद्दल बोलतात आणि दुसरीकडे खासजी क्षेत्रातील कंपन्या असे वर्तन करतात, हे कितपत योग्य आहे? कंपनीला माझ्या पात्रतेबद्दल शंका होती, तर त्यांनी तसे सांगायला हवे होते. त्यामुळे आता अशा कंपनीत नोकरी करण्याचीच इच्छा नसल्याचे झिशानने सांगितले. कंपनीच्या म्हणण्यानुसार,‘झिशानला उत्तरादाखल पाठविण्यात आलेला ई-मेल एका प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्याने पाठवला होता. आमच्याकडे धार्मिक आधारावर कोणताही भेदभाव केला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. पण अशी चूक कशी होऊ शकते? असा सवाल करत, या घटनेमुळे मनोधैर्य खचल्याचेही झिशानचे म्हणणे आहे. हा गुन्हा बीकेसी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास बीकेसी पोलीस करणार असल्याची माहिती विनोबा भावे नगर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)