खलील गिरकर
मुंबई : गोवंडीमध्ये राहून शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या शाहीन इखलाक अहमद खान या २६ वर्षीय तरुणीने आपल्या जिद्द व चिकाटीच्या बळावर व्यावसायिक वैमानिकाचा परवाना प्राप्त करण्यात यश मिळवले आहे. शाहीनने मिळविलेल्या या यशाबाबत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
सर्वसामान्य मुस्लीम कुटुंबात जन्माला आलेल्या शाहीनला लहानपणापासूनच विमानांबाबत आकर्षण होते. त्यामुळे तिने आपला ओढा ओळखून वैमानिक होण्याचा निश्चय केला. कुटुंबीयांनी तिच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी शक्य ती सर्व मदत केली व तिच्या पाठीशी उभे राहिले. या बळावर शाहीनने बारामती येथून वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले व खासगी वैमानिकाचा परवाना मिळविला. त्यानंतर व्यावसायिक वैमानिक परवाना प्राप्त करण्यात ती यशस्वी झाली. या यशानंतर एका खासगी विमान कंपनीत तिला नोकरी मिळाल्यावर कंपनीने पुढील प्रशिक्षणासाठी तिला विदेशात पाठविले व आता ती व्यावसायिक वैमानिक म्हणून काम करू लागली आहे.
शाहीनच्या या यशाबद्दल तिचे वडील इखलाक खान व काका कमाल खान यांनी आनंद व्यक्त केला. तिला लहानपणापासून विमानांची आवड होती, तिच्या खेळण्यांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात विमानांचा समावेश असायचा. केवळ विमानात बसण्याऐवजी विमान उडविण्याची तिची इच्छा होती. वैमानिक होऊन तिने स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासोबत आमचे स्वप्नदेखील पूर्ण केले आहे, असे ते म्हणाले.
गोवंडीसारख्या विभागात शिक्षण घेऊन वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण केल्याबाबत समाजवादी पक्षाचे सचिव अयुब शेकासन यांनी तिचे कौतुक केले. तिच्या या कामगिरीपासून प्रोत्साहन घेऊन अधिकाधिक मुली या क्षेत्रात येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शाहीनने आपल्या कामगिरीतून समाजासमोर आदर्श उभा केल्याचे ते म्हणाले.एखादे ध्येय समोर ठेवले तर ते पूर्ण करणे अशक्य नसते, यावर माझा विश्वास होता. व्यावसायिक वैमानिक होणे हे माझे स्वप्न होते ते पूर्ण करण्यात मला यश मिळाले असून त्यामध्ये कुटुंबीयांच्या पाठिंब्याचा मोठा वाटा आहे. मुलींनी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी व स्वत:ला सिद्ध करावे.- शाहीन खान, वैमानिक