नवी मुंबई : जगप्रसिध्द एलिफंटा लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी नवी मुंबईतील बेलापूर येथून आता थेट प्रवासी बोट सेवा सुरू करण्यात आली आहे. स्थानिक भूमिपुत्रांनी स्थापन केलेल्या ‘हिंदजल प्रवासी वाहतूक सहकारी संस्थे’च्या माध्यमातून शुक्रवारपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे साधारण वीस मिनिटांत एलिफंटाला पोहचता येणार आहे. दिवसातून दोन फेऱ्या आहेत. मुंबईपासून काही अंतरावर असलेली एलिफंटा किंवा घारापुरी लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. नवी मुंबईकरांना तिथे थेट पोहोचण्यासाठी कोणतेच साधन नाही. त्यामुळे त्यांना मुंबई गाठून तिथून एलिफंटाला जावे लागते. शहरातील पर्यटकांचा हा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने हिंदजल संस्थेने जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बेलापूर सेक्टर १५ येथील रेतीबंदर येथे असलेल्या तरंगत्या जेट्टीवरून आजपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व शासकीय परवानग्या प्राप्त झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सांगितले.सुरुवातीला एकच बोट तैनात ठेवण्यात आली आहे. या अत्याधुनिक बोटीच्या दिवसाला दोन फेऱ्या होत आहेत. सकाळी ९ वाजता बेलापूर येथून पहिली बोट सुटणार आहे. तीच बोट दुपारी १ वाजेपर्यंत परत जेट्टीवर येईल. त्यानंतर दुपारी २ वाजता दुसरी फेरी निघणार आहे. नवी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पुण्यातील पर्यटकांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान, भविष्यात बेलापूर ते गेट वे आॅफ इंडिया दरम्यान, प्रवासी बोट सेवा सुरू करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)बोटीचे वैशिष्ट्य : अद्ययावत उपकरणांनी सज्ज असलेल्या या बोटीची आसन क्षमता ४० प्रवाशांची आहे. बोट पूर्णपणे वातानुकूलित आहे. सुरक्षित असणाऱ्या आणि कमी पाण्यातही चालण्याची क्षमता असणाऱ्या या बोटीवर सर्व प्रवाशांना लाइफ जॅकेट सुध्दा देण्यात येत आहेत.
बेलापूर-एलिफंटा फक्त २० मिनिटांत
By admin | Published: May 22, 2015 10:54 PM