मुंबई : सिडकोकडून निधीच उपलब्ध न झाल्याने बेलापूर-सीवूड-उरण प्रकल्पाचे काम रखडले होते. मात्र आता हे काम मार्गी लागणार आहे. या कामासाठी 72 कोटी रुपये देण्याचे सिडकोने मान्य केले आहे.
1 हजार 803 कोटी रुपयांचा बेलापूर-सीवूड-उरण प्रकल्प मध्य रेल्वे आणि सिडकोच्या सहकार्याने 1996-97मध्ये घोषित करण्यात आला होता. यामध्ये सिडकोचा दोन तृतीयांश आणि मध्य रेल्वेचा एक तृतीयांश सहभाग निश्चित करण्यात आला होता. मेट्रोच्या आगमनामुळे 2011मध्ये सिडकोकडून या प्रकल्पात स्वारस्य दाखवण्यात आले नाही. त्यानंतर सिडकोने पुन्हा रुची दाखवत 2012मध्ये वर्क ऑर्डर काढली. या प्रकल्पात सिडको आणि मध्य रेल्वेचा समभाग असल्याने त्यांच्याकडून वेळोवेळी निधी येणो गरजेचे होते. मात्र 2014च्या मार्चर्पयत सिडकोने 207 कोटी रुपये आणि मध्य रेल्वेने 165 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यामुळे प्रकल्प मार्गी लागत होता. मात्र 2014-15मध्ये सिडकोकडून 78 कोटी आणि मध्य रेल्वेकडून 39 कोटी रुपये येणो गरजेचे होते. मात्र सिडकोकडून निधीच उपलब्ध झाला नाही. तर मध्य रेल्वेने 21 कोटी 85 लाख रुपये प्रकल्पासाठी दिले. त्यामुळे जमीन अधिग्रहण करण्यात अडचणी येऊ लागल्या होत्या. अखेर सिडकोने 72 कोटी रुपये देण्याचे मान्य केले असून, शुक्रवार्पयत याबाबतची पूर्तता करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)