मुंबई : इजिप्तची इमान अहमद हीचे वजन ५०० किलोहून आता २५० किलो एवढे झाले आहे. यानंतर पुढच्या टप्प्यात तिचे आणखी ५० किलो वजन कमी होणार असून त्यानंतर ती इजिप्तला रवाना होणार असल्याचे सैफी रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इमानला शुक्रवारी विशेष खोलीतून हलविण्यात आले आहे. आता ती सैफी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील खोलीत राहत आहे, यावेळेसही क्रेनच्या सहाय्याने इमानची खाट हलविण्यात आली.इजिप्तहून ११ फेब्रुवारीला मुंबईत दाखल झालेल्या इमानचे वजन कमी करण्यासाठीचे उपचार ६० टक्के पूर्ण झाले आहेत. या प्रक्रियेत तिचे औषधे आणि फिजिओथेरपीमुळे वजनात घट झाल्याचीही माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. इमानचा थायरॉइडचा आजार आता नियंत्रित परिस्थितीत असल्याचे रुग्णालयाने सांगितले. सध्या ती पाठ टेकून बसू शकते. मात्र भविष्यात इमानला चालण्यासाठी अडथळे येतील. गेली २५ वर्षे इमान अंथरुणाला खिळलेली आहे. वयाच्या ११ व्या वर्षी तिला अर्धागवायूचा झटका आला होता. त्यामुळे पायांचे स्नायू कमकुवत झाल्याची माहिती डॉ.मुफ्फजल लकडावाला यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)
इमानचे आणखी ५० किलो वजन घटणार
By admin | Published: April 17, 2017 3:19 AM