मुंबई - सरकारी रुग्णालय म्हटलं की रुग्णालयाची दूरवस्था, तेथील रुग्णांची गैरसोय आणि नातेवाईकांचा मनस्ताप, अशीच आपल्या मनातील कल्पना आहे. त्यामुळे, उपचारासाठी मोफत असलेल्या सरकारी रुग्णालयात जाण्याऐवजी आपण खासगी रुग्णालयांना प्राधान्य देतो. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतो, तेथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटीलीटीच आपणास भारी वाटायला लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्चही होतो. मात्र, एखाद्या सरकारी रुग्णालयात तशीच सुविधा तुम्हाला मिळाली, सरकारी रुग्णलयाचं इन्फ्रास्ट्रक्चरही तसंच असेल, तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
तुकाराम मुढेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका सरकारी रुग्णालयाचा व्हिडिओ शेअर केला आहे. एका पंचतारांकित हॉस्पीटलप्रमाणे हे रुग्णालय असल्याचं दिसून येते. तुकाराम मुंढेंनी शेअर केलेला व्हिडिओ 1.53 मिनिटांचा आहे. गडचिरोलीतील सरकारी रुग्णालयाचा हा व्हिडिओ असून तुम्हालाही हे रुग्णालय पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसेल. कारण, या व्हिडिओत दिसणाऱ्या रुग्णालयाची स्वच्छता, मल्टीस्पेशालिटी सुविधा आणि डेकोरेट हे भुरळ घालणारं आहे. एका खासगी रुग्णालयालाही मागे टाकेल, असा बडेजाव या रुग्णालयाचा आहे. दिपक सिंगला यांनी केलेल्या कामाचा परिणाम म्हणजे हे चकाकणारे सरकारी रुग्णालय आहे. याबद्दल गडचिरोलीच्या सर्व टीमचं तुकाराम मुंढेंनी अभिनंदन केलंय. एका जिल्हा रुग्णालयाचा चेहरामोहराच बदलून टाकण्याचं काम सिंगला यांनी केलंय.
गडचिरोलीतील हे सरकारी रुग्णालय राज्यातील सर्वच जिल्ह्यांसाठी एक रोल मॉडेल बनू शकतं. दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ज्याप्रकारे शाळांचा कायापालट केला, त्यानंतर देशभरातून या शाळांचं कौतुक झालं. विशेष म्हणजे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलिनिया ट्रम्प यांनीही दिल्लीच्या शाळांचं कौतुक केलं होतं. आता, त्याचप्रमाणे गडचिरोलीतील जिल्हा रुग्णालयाचा कायापालट करण्यात आला आहे. एक सरकारी रुग्णालय कसं असावं, कशा रितीने नागरिकांच्या मनात सुविधेच्या माध्यमातून घर करावं, हे दर्शवणारा हा व्हिडिओ आहे.