लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकाच गावातला असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून व्यवहार करणे काळबादेवीतील सराफाला भलतेच महागात पडले आहे. व्यापाऱ्याने सराफाचे ११ लाख रुपयांचे दागिने घेऊन पैसे न देता फसवणूक केली. याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस तपास करत आहेत.
मूळचे राजस्थानमधील रहिवासी असलेले तक्रारदार ४९ वर्षीय सराफ भांडुप परिसरात कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांचा झवेरी बाजार येथे सोन्याच्या दागिन्यांचा घाऊक खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या गावच्या ओळखीतील असलेल्या दशाना ऊर्फ चोकसिंग याने २०१० मध्ये अलिबागमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीचे दुकान सुरू केले.
गावच्या ओळखीचा असल्याने त्यांनी त्याच्यासोबत व्यवसाय करण्यास सुरूवात केली. गेल्यावर्षी २० जानेवारी रोजी त्याने ११ लाख रुपये किमतीचे २६३.६९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पसंत केले. त्यावेळी दशाना याने पेमेंटचा धनादेश दिला होता. तक्रारदार यांनी हा धनादेश वठवण्यासाठी बँकेत भरला असता खात्यात रक्कम नसल्याने तो वठला नाही. व्यवसायामध्ये नुकसान झाल्यामुळे त्याने त्याचे दुकान बंद केल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर त्याने ना सोन्याचे दागिने परत केले ना या दागिन्यांची रक्कम परत केली. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने अखेर तक्रारदार यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.