पाचवीपर्यंतच्या वर्गांची घंटा सकाळी नऊपूर्वीच; पायाभूत सुविधांच्या अभाव 

By रेश्मा शिवडेकर | Published: April 20, 2024 10:28 AM2024-04-20T10:28:14+5:302024-04-20T10:28:25+5:30

पायाभूत सुविधांच्या अभावामुळे जुन्याच वेळापत्रकानुसार जूनमध्ये उघडणार शाळा

bell for classes up to fifth is before nine in the morning Lack of infrastructure | पाचवीपर्यंतच्या वर्गांची घंटा सकाळी नऊपूर्वीच; पायाभूत सुविधांच्या अभाव 

पाचवीपर्यंतच्या वर्गांची घंटा सकाळी नऊपूर्वीच; पायाभूत सुविधांच्या अभाव 

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
: पाचवीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरविण्याला असलेला पालक-शिक्षकांचा विरोध, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे मुंबईत दोन सत्रांत चालणाऱ्या शाळा जूनमध्ये जुन्या वेळापत्रकानुसारच उघडतील. काही शाळांनी याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन पूर्व प्राथमिक ते पाचवीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरविता येणे शक्य नसल्याने जुन्याच वेळापत्रकानुसार शाळा सुरू होईल, असे कळविले आहे.
 
ठाण्याच्या मंदिर ट्रस्टची प्राथमिक शाळा दोन सत्रात भरविली जाते. ‘शाळेला जागेअभावी पाचवीपर्यंतचे सर्व वर्ग नऊनंतर भरविता येणे प्रशासनाला शक्य नाही. त्यामुळे आम्ही जूनमध्ये जुन्या वेळापत्रकानुसार वर्ग भरवू. त्याबाबतचे पत्र आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे,’ अशी माहिती ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली.

मुंबई, ठाणे किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांच्या ठिकाणी एकाच इमारतीत केजीपासून बारावीपर्यंतचे वर्ग भरविले जातात. अशा ठिकाणी वेळांबाबतचे नियम पाळणे शक्य नाही. गेले दोन महिने मुंबईतील शाळांच्या बैठकांमध्ये या प्रश्नावर चर्चा होत आहे. त्यात अनेक शाळांनी आपल्या अडचणी मांडल्या. काही दिवसांपूर्वी मुंबईतील आयसीएसई शाळांच्या बैठकीतही या प्रश्नावर चर्चा झाली. 

मुंबईत मोठी अडचण
मुंबईत तरी हा प्रश्न प्रामुख्याने पहिली ते चौथीच्या वर्गाचा आहे. कारण मुंबईतील सुमारे १,१०० शाळांपेक्षा बहुतांश ज्युनिअर-सीनिअर केजीचे वर्ग दुपारी किंवा सकाळी साडेआठनंतरच भरविले जातात. पहिली ते चौथीचे वर्ग एकतर सकाळी सात किंवा दुपारी एक वाजता भरविले जातात. ते मध्येच म्हणजे नऊ वाजता भरवायचे झाल्यास शाळा, पालक आणि वाहतुकीच्या दृष्टीनेही अडचणीचे ठरेल. - डॉ. विनय राऊत, सहकार्यवाह, महामुंबई शिक्षण संस्था 

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशात नाही स्पष्टता
- मुंबईतील शाळा व्यवस्थापनांनी वेळेबाबतच्या नियमांत शिथिलता आणावी, याकरिता राज्य सरकारशी पत्रव्यवहारही केला आहे. सध्या तरी वेळा पाळण्याबाबत राज्य सरकारचे धोरण फारसे सक्तीचे नाही. मात्र, याबाबत स्पष्टता हवी, अशी मागणी शाळांकडून केली जात आहे. 
- ज्या शाळांना वेळेचे नवे नियम पाळणे शक्य नाही, त्यांना त्यातून सवलत दिली जाईल. मात्र, त्यासाठी संबंधित शिक्षण अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे शालेय शिक्षण विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे. मात्र, याबाबत पुरेशी स्पष्टता नाही, असे महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे सहकार्यवाह डॉ. विनय राऊत यांनी सांगितले.

Web Title: bell for classes up to fifth is before nine in the morning Lack of infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.