Join us

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची घंटा वाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:05 AM

मुंबई : दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आणण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट अनेक देशांमध्ये सुरू ...

मुंबई : दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आणण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट अनेक देशांमध्ये सुरू झाल्याची धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे. दुसऱ्या लाटेच्या अनुभवावरून नवीन येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिकेची तयारी सुरू आहे.

ऑक्सिजन उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. तसेच शहर, पूर्व आणि पश्चिम येथे प्रत्येकी दोन हजार खाटांच्या क्षमतेचे जम्बो कोविड केंद्र उभारण्यात येत आहेत. अतिदक्षता विभागातही खाटांची संख्या वाढविण्यात येत आहे. यावेळेस ७० टक्के ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे.

पहिली लाट

एकूण रुग्ण - ३०८०५७

बरे झालेले रुग्ण - २९०४००

मृत्यू - ११३३४

दुसरी लाट

एकूण रुग्ण - ४२२६५०

बरे झालेले रुग्ण - ४१५६४०

मृत्यू - ४३५६

१६ टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण

१८ वर्षे वयोगटावरील एकूण लोकसंख्या - ९५ लाख

एकूण लसीकरण - ६४४८८२५

पहिला डोस - ४९८३२०७

दोन्ही डोस- १४६५६१८

ऑक्सिजन प्लांट तयार

* दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची दररोजची मागणी २३५ मेट्रिक टन वर पोहोचली होती. भविष्यात ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवू नये, यासाठी पालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये १६ ऑक्सिजन प्लांट उभारून दररोज ४५ मेट्रिक टन ऑक्‍सिजन उपलब्ध होणार आहे.

* दोन हजार लिटर प्रतिमिनिट आणि तीन हजार लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन उत्पादन यंत्रणा उभारण्यात येणार आहेत.

* वरळीतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा, राजावाडी, कूपर आणि कस्तुरबा या पालिकेच्या पाच रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून दररोज एकूण ६.९३ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होणार आहे.

तीन जंबो केंद्र; ८३५० खाटा वाढवणार

विविध रुग्‍णालये, जंबो सेंटर्स, कोविड केंद्रे १ आणि २ - पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये ७३०७ खाटांवर ७७ हजार रुग्णांनी उपचार घेतले. दुसऱ्या टप्‍प्‍यामध्‍ये ८३५० खाटा उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे. यात कांजूरमार्ग येथे दोन हजार २००, मालाडमध्‍ये दोन हजार २००, शीव येथे एक हजार २००, वरळी रेसकोर्स येथे ४५०, भायखळा येथील रिचर्डसन एण्‍ड क्रूडासमध्‍ये ७००, गोरेगाव नेस्‍को दीड हजार १०० खाटा वाढविण्‍यात आल्या आहेत. यातील ७० टक्‍के ऑक्सिजन खाटा आहेत.

लहान मुलांसाठी वेगळे केअर सेंटर

कोरोनाचा तिसर्‍या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे पालिका रुग्णालय व जंबो कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी राखीव खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच संसर्गाचा धोका टळण्यासाठी महापालिकेमार्फत सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील बालरोग तज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच सर्व आरोग्य केंद्राच्या स्तरावर घरोघरी पाहणी, सर्व झोपडपट्टी परिसर, सार्वजनिक शौचालये आदी ठिकाणी स्वच्छता राखण्यात येणार आहे.

कोट :

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तीन जंबो कोविड केंद्र उभारण्यात येत आहेत. यामध्ये प्रत्येकी दोन हजार खाटांची सोय असणार आहेत. तसेच ७० टक्के ऑक्सिजन खाटा असणार आहेत. ऑक्सिजन प्लांटही उभारण्यात येत आहेत.

- सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)