लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट धार्मिक आणि धर्मदाय ट्रस्ट असून, संस्थानाला देण्यात आलेल्या बेनामी देणग्यांवर कर आकारू शकत नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट धार्मिक आणि धर्मादाय ट्रस्ट असल्याने संस्थानला देण्यात आलेल्या बेनामी देणग्यांवर कर आकारू शकत नाही, असा निर्णय आयकर अपिलीय न्यायाधिकरणाने निकाल दिला होता. त्याला आयकर आयुक्तांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. सोमशेखर सुंदरेसेन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती.
‘आमचे स्पष्ट मत आहे की, करनिर्धारक (शिर्डी संस्थान) निश्चितपणे एक धार्मिक आणि धर्मादाय ट्रस्ट आहे, म्हणून, करनिर्धारकाने कलम ११५ बीबीसीच्या उप-कलम २(बी) अंतर्गत केलेला दावा योग्य आहे,' असे खंडपीठाने म्हटले. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, २०१९ पर्यंत, ट्रस्टला एकूण ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या आणि त्यातील २ कोटी धार्मिक हेतूसाठी खर्च केले, तर मोठी रक्कम शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि वैद्यकीय सुविधांसाठी खर्च केली. त्यावरून ते धार्मिक ट्रस्ट असल्याचे दिसते.