वसुंधरा दिनानिमित्त उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वसुंधरा दिनानिमित्त राबवल्या जाणाऱ्या ‘कार्टन्स ले आओ, क्लासरूम बनाओ’ या उपक्रमाअंतर्गत माटुंगा रोड पश्चिम येथील महानगरपालिकेच्या सिटी ऑफ लॉस एंजेलिस शाळेला बेंच दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे हे बेंच ५ लाख वापरलेल्या टेट्रापॅकपासून बनविले जाणार आहेत.
आरयूआर ग्रीनलाइफमार्फत राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामध्ये २२ एप्रिल, वसुंधरा दिनाचे औचित्य साधून ग्राहकांना वापरलेली कार्टन पॅकेजेस त्यांच्या नजीकच्या आस्थापनांमध्ये आणून देण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. हे रिसायकल्ड बेंचेस दिसायला आकर्षक, मजबूत व टिकाऊ आहेत. तसेच त्याद्वारे रिसायकलिंगचा महत्त्वपूर्ण संदेश दिला जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच त्याला मुंबई महानगरपालिकेनेही पाठिंबा दिला आहे. २०१० मध्ये सुरू केलेल्या ‘गो ग्रीन विथ टेट्रा पॅक’ या अभियानाचा हा एक भाग आहे. ज्यूस, दूध, ओआरएस व अन्य पेयांची वापरलेली कार्टन्स मुंबईत डिपॉझिट पॉइंट्स म्हणून निश्चित करण्यात आलेल्या दोनशे स्थळांपैकी कोणत्याही ठिकाणी नेऊन देण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.