मुंबई : ए वार्ड विभागातील चतुर्थ श्रेणीतील कामगार असलेल्या कामगाराने, १६ वर्षांत तब्बल ६५ लाख ६६ हजार ७७१ रुपयांची बेनामी मालमत्ता जमविली आहे. मुंबईत फ्लॅट, सोन्याचे दागिने व विविध बॅँकामधून त्याच्याकडे इतकी अवैध संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. रवींद्र गजानन जाधव (वय ४९) असे या कामगाराचे नाव असून, त्याची पत्नी रविना (४५) हिच्याविरुद्ध अवैध मालमत्ता बाळगल्याप्रकरणी, एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. दोघांच्या नावे ही बेनामी मिळकत ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल २८६.६८ टक्के अधिक असून, जाधव याच्या मालमत्तेबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.रवींद्र जाधव हा पालिकेच्या ए वार्डमधील फोर्ट येथील कार्यालयात कामगार आहे. त्याने पदाचा गैरवापर करत लाखोंची संपत्ती मिळविल्याची तक्रार एसीबीकडे आली होती. त्यानुसार, विभागाकडून त्याच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येत होती. त्यामध्ये त्याच्या नावे मध्य मुंबईत फ्लॅट, स्वत:च्या व पत्नी रविनाच्या नावे विविध बॅँकांमध्ये लाखोंच्या ठेवी. त्याचप्रमाणे, पत्नीकडे सोन्याचे ५० तोळे दागिने असल्याचे स्पष्ट झाले. ही सर्व मिळकत त्याने २२ नोव्हेंबर १९९५ ते ३० सप्टेंबर २०११ या कालावधीत मिळवली असून, ती एकूण ६५ लाख ६६ हजार ७७१ रुपये एवढी आहे. कामगाराच्या नोकरीव्यतिरिक्त उत्पन्नाचा अन्य कोणताही ज्ञात मार्ग नसल्याने, त्याने गैरमार्गाने रक्कम मिळविली असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
पालिकेच्या कामगाराकडे लाखोंची बेनामी संपत्ती
By admin | Published: October 07, 2016 5:51 AM