कुटुंबातील प्रत्येक क्रियाशील सदस्याला मत्स्य पॅकेजचा लाभ; अटी शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:07 AM2021-03-10T04:07:06+5:302021-03-10T04:07:06+5:30
मुंबई : मच्छीमार बांधवांसाठी शासनाने घोषित केलेल्या ६५ कोटी १७ लाख २० हजारांच्या पॅकेजमधील प्रतिकुटुंब एकच लाभ ही अट ...
मुंबई : मच्छीमार बांधवांसाठी शासनाने घोषित केलेल्या ६५ कोटी १७ लाख २० हजारांच्या पॅकेजमधील प्रतिकुटुंब एकच लाभ ही अट आता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांना मत्स्य पॅकेजचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला झाला आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
क्यार, महा चक्रीवादळग्रस्त मच्छीमार बांधवांना दिलासा देण्यासाठी आणि ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१९ मध्ये वादळी हवामानामुळे मासेमारी करता न आल्यामुळे मच्छिमारांना संकटाला सामोरे जावे लागले होते. सोबत पॅकेजच्या लाभासाठी राष्ट्रीयीकृत बँकेतच खाते असण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाती असणाऱ्या पात्र लाभार्थांनाही मत्स्य पॅकेजचा लाभ मिळू शकणार आहे.
पात्र लाभार्थी एकापेक्षा जास्त मच्छीमार संस्थांचा सभासद असल्यास त्याला कोणत्याही एकाच संस्थेतून, एकाच घटकाखाली पॅकेजचा लाभ मिळू शकेल. पारंपरिक रापणकार / नौकामालकांच्या कुटुंबातील महिला मासे विक्री करीत असल्यास त्या कुटुंबातील एका पात्र महिलेस दोन शीतपेट्या देण्यात येतील. त्या महिलेच्या नावे नौका असल्यास त्या महिला लाभार्थीस नौका अर्थसाहाय्य किंवा शीतपेटी यांपैकी केवळ एकाच घटकाखाली लाभ मिळू शकेल.
------------------
सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्रात १३,८३८ यांत्रिकी मासेमारी नौका
१५६४ बिगर यांत्रिकी मासेमारी नौका
एकूण १५,४०२ मासेमारी परवानाधारक मासेमारी नौका
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९६ पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे रापणकर संघ