मुंबई : मुंबईत अनेक भागांमध्ये उभ्या असलेल्या झोपड्यांच्या टॉवर्सला उंची वाढविण्याची परवानगी देण्याच्या मागणी आतापर्यंत केली जात होती. मात्र, अशा एक मजली झोपड्यांच्या पोटमाळ्यावर दुसरे कुटुंब असल्यास त्यालाही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा लाभ द्यावा, अशी ठरावाची सूचना भाजपा नगरसेवकाने पालिका महासभेच्या पटलावर मांडली आहे. सन २००० पर्यंतचा पुरावा असलेल्या अशा कुटुंबांना सदनिका मिळावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.मुंबईत सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना राज्य सरकारने संरक्षण दिले आहे, तसेच झोपड्यांच्या १४ फुटांपर्यंत उंची वाढविण्याची परवानगी आहे. अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन करून झोपड्यांचे टॉवर उभे राहिले आहेत. अनेकांनी या झोपड्यांच्या टॉवरमध्ये पोटमाळा काढून वरचा मजला भाड्याने दिला आहे, तरीही या झोपड्यांची उंची २० फुटांपर्यंत वाढविण्याची परवानगी काँग्रेसने महापालिका निवडणुकीपूर्वी २०१६ मध्ये केली होती. लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपुन्हा अशीच एक मागणी पुढे आली आहे.मात्र, या वेळेस ही मागणी राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा पक्षाच्या नगरसेवकाकडून करण्यात येत आहे. नगरसेवक विनोद मिश्रा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी महासभेपुढे मांडली आहे. झोपडपट्टीमधील पात्र झोपडी धारकाला झोपु योजनांतर्गत मोफत सदनिका देण्यात येतात. बऱ्याच वेळा झोपड्यांच्या दोन्ही भागांत दोन स्वतंत्र कुटुंबे राहतात. मात्र, त्यांना एकच सदनिका मिळते. त्यामुळे झोपडपट्ट्यांच्या वरील भागात राहणाºया कुटुंबाकडे सन २००० पूर्वीचे वास्तव्याचे पुरावे असल्यास, त्यांनाही झोपु योजनेचा लाभ द्यावा,अशी ठरावाची सूचना त्यांनी मांडली आहे.ही ठरावाची सूचना पालिका महासभेत मंजूर झाल्यानंतर, नगर विकास खात्याकडे महापौरांमार्फत पाठविण्यात येईल.मुंबईतील झोपडपट्ट्यांमधून मालमत्ता कर वसूल करण्याचा प्रस्ताव लांबणीवर टाकण्यात आला आहे.
झोपड्यांच्या पोटमाळ्यावरील कुटुंबालाही सदनिकेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 2:28 AM