तज्ज्ञांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर गृहकर्जाचे व्याजदर कधी नव्हे एवढे कमी झाले. त्यामुळे घरांच्या विक्रीला चालना मिळाली असून हे व्याजदर किमान एक वर्षभर तरी लागू राहतील, असे संकेत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिले.
देशातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या नरेडकोच्या वतीने नुकतीच एक रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर समिट आयोजित करण्यात आली होती. या वेळी एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष केकी मिस्त्री यांनी हे संकेत दिले. २००७ साली दाखल झालेल्या आर्थिक मंदीत गृहकर्जाचे व्याजदर अचानक कोसळले होते. त्यानंतर बांधकाम व्यवसायाची भरभराट झाली. तसेच, अनेकांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न आवाक्यात आले. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक मंदीतही त्याची पुनरावृत्ती होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, दहा-बारा वर्षांपूर्वी भारतीय लोकांना मंदीचा फटका बसला नव्हता. त्यामुळे घराच्या खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढले होते. यंदा त्याची पुनरावृत्ती होईलच याची शाश्वती देता येत नसल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बँकांचे व्याजदर सध्या साडेसहा टक्क्यांवर आले आहेत. त्यामुळे गृह कर्जांचा मासिक हप्ता कमी झाला आहे. त्यामुळे कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. घरांची विक्री वाढविण्यासाठी सरकार आणि बांधकाम व्यावसायिकांकडून अनेक सवलती दिल्या असून त्या गृहविक्रीच्या पथ्यावर पडत आहेत. पुढील वर्षभर जर हे व्याजदर कायम राहिले तर गृहविक्रीचे अच्छे दिन कायम राहतील, असे संकेतही या वेळी देण्यात आले.
..........................