शिधापत्रिका नसली तरी महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 06:10 AM2018-12-06T06:10:29+5:302018-12-06T06:10:35+5:30
शिधापत्रक नसलेल्या कामगारांच्या कुटुंबांनाही महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या मात्र शिधापत्रक नसलेल्या कामगारांच्या कुटुंबांनाही महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ४८ हजार ५५३ कुटुंबांना या योजनेतून मोफत वैद्यकीय उपचार मिळतील, अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली.
यासंदर्भात विमा कंपनी, कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्त बैठका घेण्यात आल्या होत्या. राज्यात सहा लाख कामगार असून ज्या कामगारांकडे पिवळे अथवा केशरी रंगाची शिधापत्रिका आहे, त्यांना या योजनेतून लाभ देण्यात येतो. मात्र शिधापत्रिका नसलेले सुमारे ४९ हजार बांधकाम कामगार कुटुंबे असून त्यांनाही योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कामगार कल्याण मंडळाकडून बांधकाम कामगारांना नोंदणीच्या वेळी जे ओळखपत्र देण्यात येते त्यावर कामगाराच्या तपशिलांसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा छायाचित्रासह तपशील दिला जातो. या ओळखपत्रावर योजनेचा लाभ मिळेल.