योजनांचे लाभही जनतेपर्यंत पोहोचवावेत
By admin | Published: September 25, 2016 03:41 AM2016-09-25T03:41:09+5:302016-09-25T03:41:09+5:30
विलेपार्ले येथून ३२ हजारांच्या मताधिक्क्याने मी विधानसभेत पोहोचलो. त्यामुळे काँग्रेस नगरसेवक मात्र हवालदिल झाले आहेत. समस्या, गाऱ्हाणी घेऊन जाणाऱ्या
- गौरीशंकर घाळे
विलेपार्ले येथून ३२ हजारांच्या मताधिक्क्याने मी विधानसभेत पोहोचलो. त्यामुळे काँग्रेस नगरसेवक मात्र हवालदिल झाले आहेत. समस्या, गाऱ्हाणी घेऊन जाणाऱ्या नागरिकांना ‘जा, आता मोदींनाच कामे सांगा’ अशी भाषा हे नगरसेवक वापरत आहेत. या विचित्र वागण्याचा फटका त्यांना बसणारच आहे. परंतु, त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांची आणि योजनांची केवळ माहिती लोकांपर्यंत पोहोचवून चालणार नाही. तर, त्या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवावे लागणार आहेत, असे मत भाजपा आमदार पराग अळवणी यांनी ‘लोकमत व्यासपीठ’मध्ये बोलताना व्यक्त केले.
अनेक वर्षे महापालिकेत काम केले. आता विधान भवनात वावरताना काही फरक जाणवतो का ?
- कामाचा पसारा वाढलाय. ही नगरसेवकाची कामे, ती आमदारांची कामे, अशी वर्गवारी लोक करीत नाहीत. त्यामुळे नगरसेवक असताना जी कामे करायचो ती आताही करावी लागतात. उलट आधी एकाच वॉर्डातील कामे असायची. आता मतदारसंघातील साऱ्या वॉर्डांतून समस्या आणि तक्रारी घेऊन लोक येतात.
मग ही नवी जबाबदारी कशी हाताळता?
- मी माझ्या मतदारसंघापुरती एक यंत्रणा उभारली आहे. दिवसभर समस्या, गाऱ्हाणी घेऊन येणाऱ्या लोकांची आणि त्यांच्या कामाची यादी केली जाते. कामांचे वर्गीकरण करून प्रत्येक कामासाठी कार्यकर्ता निश्चित केला आहे. त्यामुळे मी कार्यालयात नसलो तरी समस्या ऐकल्या जातात आणि त्यावर काम सुरू होते.
आमदारांनी पालिका स्तरावरील कामात अडकू नये म्हणता ते का?
- विशिष्ट नियम अथवा धोरणामुळे कितीही पाठपुरावा केला तरी एखादे काम होत नाही, हा अनेक नगरसेवकांचा अनुभव आहे. आमदार म्हणून असे धोरण, नियमात सुधारणा करण्याची संधी असते. विधिमंडळात विविध माध्यमांतून असे बदल घडविण्यात भूमिका बजावता येते.
विलेपार्लेतील प्रलंबित प्रश्नांवर काय सांगाल?
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे विमानतळ परिसरातील झोपड्यांचे त्याच जागेवर पुनर्वसन करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. शिवाय, विमानतळाच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्नही येत्या काही काळात मार्गी लागणार आहे.
विमानतळ जागेवरील झोपड्यांच्या सर्वेक्षणावरूनही मोठा वाद सुरू आहे. लोकांचा विरोध कशामुळे आहे?
- लोकांचा विरोध नाही. विरोधकांनीच गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. नेमक्या किती झोपड्या आहेत याची आकडेवारीच कोणाकडे नाही. मग पुनर्वसन कसे करणार? मतदारसंघाबाहेरील लोक उभे करून सर्वेक्षणाला विरोध असल्याचा कांगावा विरोधकांनी चालविला आहे.
या दोन वर्षांत मतदारसंघात झालेली कामे कोणती?
- विमानतळ, मेट्रोचे प्रश्न अंतिम टप्प्यात आहेत. विनाकारण रखडलेल्या ‘झोपु’ योजना मार्गी लागल्या आहेत. एस. व्ही. रोडला लागून अंधेरी-सांताक्रुझ भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे.
तेथील पाण्याची पाइपलाइन १२ इंचांची केली आहे. अनेक भागांत मलनिस्सारण व्यवस्था उभारण्याचे काम हाती घेतले
आहे.
मतदारसंघातील एखादा वेगळा उपक्रम?
- ‘स्वच्छ भारत’च्या धर्तीवर आम्ही ‘स्वच्छ पार्ला’ अभियान चालविले आहे. आतापर्यंत ५८ सोसायट्यांनी यशस्वीपणे हा उपक्रम राबविला आहे. आणखी १२५ सोसायट्या आमच्या संपर्कात असून, तेथेही योजना राबविली जाईल. सध्या पार्ल्यात १५ ठिकाणी आठवडी बाजारचे टेम्पो उभे राहतात. त्यातून ग्राहकांना स्वस्त आणि ताजी भाजी मिळते.
संघटनात्मक पातळीवर काय सुरू आहे?
- कार्यकर्ता आणि सरकार यातील दुवा आमदार असतो. त्यामुळे पार्टी विथ डिफरन्सच्या धर्तीवर ‘पॉवर विथ डिफरन्स’ ही संकल्पना आम्ही राबवित आहोत. त्यासाठी कार्यशाळा सुरूआहेत.