Join us  

बंगाली बाबा उघडे पडले; तरीही जादूटोण्याच्या घटनांचे प्रमाण १० ते २० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:10 AM

मुंबई : मुंबईसारख्या मायानगरीत भानामतीच्या घटना घडण्याचे प्रमाण कमी आहे. तरी जादूटोण्याच्या घटना घडतच आहेत. आजघडीला हे प्रमाण सरासरी ...

मुंबई : मुंबईसारख्या मायानगरीत भानामतीच्या घटना घडण्याचे प्रमाण कमी आहे. तरी जादूटोण्याच्या घटना घडतच आहेत. आजघडीला हे प्रमाण सरासरी १० ते २० टक्के आहे. दाखल झालेल्या तक्रारीनंतर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या पाठपुराव्यानंतर येथील बंगाली बाबा उघडे पडले आहेत. अशा घटनांचे येथून समूळ उच्चाटन झालेले नाही.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नंदकिशोर तळाशीलकर यांनी सांगितले की, मुंबईत जादूटोण्याचे प्रमाण आहे. बंगाली बाबा गायब झाले. आता त्यांची साईबाबाचा आशीर्वाद, साईबाबाच्या नावाने वेगळ्या पद्धतीने जाहिरात सुरू आहे. त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा धंदा सुरू ठेवला आहे. रेल्वेला आम्ही कळविले की, तुम्ही जादूटोणी विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार करत आहात. रेल्वेत ज्या जाहिराती होत्या, त्या जाहिरातीसुद्धा रेल्वेने काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांना दंड करण्यास सुरुवात केली. छुप्या पद्धतीने जादूटोण्याचे प्रकार सुरू आहेत. काही घटना उघडकीस येत आहेत. मुंबईत जादूटोण्याचे सरासरी प्रमाण १० ते २० टक्के असू शकते.

--------------

मुंबईत जादूटोणा, भानामतीसारख्या घटनांचे प्रमाण कमी आहे. जादूटोणासारख्या घटना घडत असतात. मुंबईत भानामतीसारख्या घटना नाहीत. मोठे शहर असल्याने अशा घटना घडत नाहीत.

--------------

प्रत्येक पोलीस ठाण्यात अशा प्रकरणात कारवाई करण्यासाठी एक दक्षता अधिकारी असतो. तो किती सक्रिय आहे. त्यावर कारवाई होत असते. बहुतांश ठिकाणी तक्रारदारांना समितीच्या कार्यकर्त्यांना गाठावे लागते. कार्यकर्ते काम करू लागले की कारवाई होते. जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा झाला आहे. त्याचे नियम पडून आहेत. मंत्रिमंडळात आलेले नाहीत.

--------------

आपल्या शिक्षणाने आणि बौद्धिक विकासाने माणसे अंधश्रद्धेतून बाहेर पडतात असे नाही. खात्री देता येत नाही. अंधश्रद्धेला आळा बसवा म्हणून समाज प्रबोधनाची गरज आहे. कायद्याची गरज आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा राबविली पाहिजे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. पाठपुरावा करूनही अंमलबजावणी होत नाही, याची खंत आहे.

- अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

--------------

प्रबोधनाची मोठी गरज आहे. कायदा अंमलबजावणीची मोठी गरज आहे. शासकीय यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. पोलीस यंत्रणा सक्षम असण्याची गरज आहे. हे वास्तव पाहिल्यानंतर आम्ही कुठे कमी पडतो की काय? असे आम्हाला वाटते. कायद्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. मुंबईतही भानामती आहे. पैशाचा पाऊस पाडण्यासारख्या घटना आहेत. लोक फसवितात, लैंगिक शोषण होते, घटनांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी घटना घडत आहेत. जेथे लोक सजग आहेत. तेथे कारवाई होते.

- ॲड. रंजना गवांदे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

--------------

मुंबईत बुवाबाजीच्या घटना घडतात.

मुंबईत तक्रार केली की कारवाई होते.

हे प्रमाण ८० टक्के आहे.

--------------