मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाला म्हणजेच बेस्ट प्रशासनला दररोज २ कोटी २६ लाखांचे नुकसान होत असल्याची माहिती समोर आली आहे.बेस्ट प्रशासनाकडे प्रति किलोमीटरमागे येणारा खर्च, प्रवासी भाडे उत्पन्न आणि एकूण प्रवासी संख्या यासंबंधीची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारली होती. यावर बेस्ट प्रशासनाचे साहाय्यक आगार व्यवस्थापक अभय शेलार यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याला दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बसने दररोज सरासरी २८ लाख ३९ हजार प्रवासी प्रवास करतात. बस प्रवर्तनाचा एकूण दैनंदिन खर्च ६ कोटी १६ लाख आहे, तर प्रति किलोमीटर खर्च ९७.७५ रुपये एवढा आहे. शिवाय प्रवाशांकडून आकारण्यात येणाऱ्या प्रवास भाड्याच्या माध्यमातून बेस्ट उपक्रमाला प्राप्त होणारे दैनंदिन उत्पन्न जून २०१५च्या आकडेवारीनुसार ३ कोटी ९० लाख एवढे आहे. दररोज बेस्टला २ कोटी २६ लाख रुपयांचे नुकसान होते आहे. (प्रतिनिधी)
बेस्टला दररोज २.२६ कोटींचे नुकसान
By admin | Published: August 04, 2015 1:35 AM