मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आणि लॉकडाऊन शिथिल होत असतानादेखील मुंबईची जीवन वाहिनी मानल्या जाणा-या बेस्ट बसने प्रवाशांना उत्तम सेवा दिली असून, भविष्यात प्रवाशांना अधिकाधिक अत्याधुनिक, सुसज्ज अशा सेवा मिळाव्यात म्हणून बेस्ट सज्ज झाली आहे. आणि त्यानुसार, टाटा मोटर्सने बनवलेल्या भाडे तत्वावरील २६ वातानुकूलित विद्युत बसगाडया बेस्टच्या ताफ्यामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. यापूर्वी भाडे तत्वावरील ४० आणि बेस्टच्या मालकीच्या ६ विद्युत बसगाडया बेस्टच्या ताफ्यामध्ये कार्यरत आहेत.
बेस्टकडे आता ३ हजार ८७५ बसगाड्यांचा ताफा आहे. ज्यामध्ये १ हजार ९९ भाडे तत्त्वावरील बसगाड्यांचा समावेश आहे. २०२२ साली भाडेतत्त्वावरील बसगाड्यांची संख्या ३ हजार असणार आहे. दुसरीकडे बेस्ट बस सातत्याने उत्तम सेवा देत आली आहे. कोरोना काळात अधिकाधिक बेस्ट बस रस्त्यांवर उतरत प्रशासनाने एसटीची देखील मदत घेतली आहे. जुन, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात बेस्टने प्रवास करणा-या प्रवाशांचे प्रमाण वाढले आहे. जुन महिन्यात हे प्रमाण ८ लाख होते. जुलै महिन्यात हे ९ लाख झाले. ऑगस्ट महिन्यात १० लाख झाले. सप्टेंबर महिन्यात १८ लाख झाले. ऑक्टोबर महिन्यात हे प्रमाण २१ लाख झाले. बेस्टने एसटीकडून १ हजार गाड्यांची मदत घेतली आहे. बेस्टच्या स्वत:च्या २ हजार ७७६ बस आहेत. ४०० हून अधिक मार्ग पुर्ण क्षमतेने चालविले जात आहेत.
लॉकडाऊन शिथिल होत असले तरी लोकल पुर्ण क्षमतेने सुरु झालेली नाही. लोकलमध्ये आजही सर्वसामान्य प्रवाशांना प्रवेश देण्यात आलेला नाही. परिणामी हे सर्व प्रवासी बेस्टचा वापर करत आहेत. बेस्टची क्षमता लोकलच्या तुलनेत साहजिकच तोकडी असल्याने प्रवाशांचा भार बेस्ट बसवर पडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, पूर्व द्रुतगती आणि पश्चिम द्रुतगती मार्ग, एस.व्ही. रोड, सांताक्रूझ लिंक रोड, कुर्ला-अंधेरी रोड, कुर्ला सांताक्रूझ रोड, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड या महत्त्वाच्या मार्गांवर बेस्ट बसने ब-यापैकी सेवा उपलब्ध करून दिली आहे. मात्र लोकलचा विचार करता ही सेवा तुलनेने कमी आहे. परिणामी लोकलचा पडलेला लोड सहन करताना बेस्टला तारेवरची कसरत करावी लागत आहे.