Join us  

फुकट्यांना ‘बेस्ट’चा दणका; एका दिवसात ५८ हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 2:27 PM

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात बेस्टने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बेस्टमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली होती. यावर उपाय म्हणून बेस्टच्या बसगाड्यामंधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध बेस्ट उपक्रमाने तिकीट तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे २ जानेवारी रोजी ९४५ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५८,४५७ दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे बेस्टच्या उत्पन्नात प्रतिदिन ८ पटपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 

बेस्टच्या बसमध्ये रोज ३२ ते ३५ लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात. बस प्रवाशांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला याच गर्दीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून उत्पन्नात घट होत असल्याचे बेस्ट प्रशासनाच्या निदर्शनास आले. सध्या बेस्ट उपक्रमाकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून देय असलेले प्रवास भाडे, अधिक प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट एवढी रक्कम दंड म्हणून आकारण्यात येते. 

३८२ तिकीट निरीक्षकांची नेमणूक :

बेस्ट उपक्रमाने २०२४ वर्षाच्या सुरुवातीपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली असून याकरता बेस्ट उपक्रमातर्फे अतिरिक्त तिकीट निरीक्षकांची मुंबईच्या विविध भागांतील गर्दीच्या ठिकाणातील बसस्थानकांवर नेमणूक करण्यात आली आहे. या अंतर्गत बेस्ट उपक्रमातर्फे विशेष पथके तयार करण्यात आली असून, या पथकामध्ये एकूण ३८२ निरीक्षकांची तिकीट तपासणी करता मुंबईच्या वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.

हा दंड भरण्याचे नाकारल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ४६० अन्वये एक महिन्यापर्यंत वाढवता येईल इतक्या कारावासाची किंवा २०० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे देण्याची तरतूद आहे.

टॅग्स :मुंबईबेस्ट