तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ‘बेस्ट’ सल्लागार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:17 AM2021-01-08T04:17:25+5:302021-01-08T04:17:25+5:30
मुंबई : मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अखेर राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ...
मुंबई : मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अखेर राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार उत्पन्न वाढविणे, तसेच मुंबई महापालिकेबरोबर समन्वय साधून बेस्टला स्वयंपूर्ण करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. पालिका मुख्यालयात राज्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आणि बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रवीण शिंदे या बैठकीत उपस्थित होते. या वेळी मुंबईतील विविध समस्या, प्रस्तावित कामे, बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढणे आणि वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
तोट्यामधून बाहेर पडण्यासाठी बेस्टने उपाययोजना करणे अपेक्षित असल्याचे मत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या वेळी व्यक्त केले. तर, बेस्टच्या समस्या, अडचणी व काही उपाययोजनाही महाव्यवस्थापकांनी मांडली. बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिका अर्थसंकल्पात विलीनीकरण करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन योजना
मुंबईत ‘एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन योजना’ अंमलात आणण्याचा विचार सुरू आहे. त्यानुसार मुलुंड, वाशी, दहिसर चेकनाका आणि भविष्यातील न्हावा-शेवा या ठिकाणी परराज्यातील बसगाड्या थांबविण्यात येतील. तेथून पुढे या प्रवाशांना बेस्टच्या बसगाड्यांमधून मुंबईत विविध ठिकाणी जाता येणार आहे. त्यामुळे परराज्यातील नागरिकांचा प्रवास सुखकर होईल, वाहतूककोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. तसेच, तोट्यातील बेस्टलाही उत्पन्न वाढविण्यासाठी एक साधन मिळेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.