महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार; CM शिंदे, धनंजय मुंडे स्वीकारणार सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 03:18 PM2024-07-08T15:18:15+5:302024-07-08T15:18:31+5:30

अनेक योजना यशस्वीरित्या राबवल्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण कृषी क्षेत्रातील समृद्धीला लक्षणीय चालना मिळाली, असे पुरस्कार समितीचे निष्कर्ष आहेत.

best agricultural state 2024 award to maharashtra and cm eknath shinde shinde and dhananjay munde will attend ceremony | महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार; CM शिंदे, धनंजय मुंडे स्वीकारणार सन्मान

महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार; CM शिंदे, धनंजय मुंडे स्वीकारणार सन्मान

मुंबई: माजी सरन्यायाधीश, केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सथाशिवम यांच्यासह १५ जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला २०२४चा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. येत्या ११ जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इन मध्ये १५ व्या ‘एग्रीकल्चर लीडरशिप कोन्क्लेव्ह’मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. या पुरस्काराची सुरुवात २००८ सालापासून करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र शासनाने मागील वर्षात पर्यावरणाच्या संरक्षणासह अन्नसुरक्षा, सर्वात मोठी बांबू लागवड, तृणधान्य अभियान, औष्णिक वीज निर्मितीत बायोमास चा वापर यांसारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून १.७ दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे १२३ मेगा सिंचन प्रकल्प, पंतप्रधान किसान सन्मान निधी दुप्पट करणारे देशातील पहिले राज्य, त्याचबरोबर ४.६३ लाख शेतकऱ्यांना नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांचे वितरण, सूक्ष्म बाजरी कार्यक्रम, डाळींच्या उत्पादनात देशात अव्वल स्थान, तसेच एक रुपयात पीक विमा योजना राबवणारे देशातील एकमेव राज्य असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. यामुळे लाखो शेतकऱ्यांवर सकारात्मक परिणाम झाला असून ग्रामीण कृषी क्षेत्रातील समृद्धीला लक्षणीय चालना मिळाली असल्याचे पुरस्कार समितीचे निष्कर्ष आहेत. 

कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण धोरणे आणि उच्च प्रभावी विकासात्मक उपक्रमांद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे. एग्रीकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, ब्राझील, अल्जेरिया, नेदरलँड इत्यादी देशांचे राजदूत तसेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड आदी राज्यांचे मंत्री यांचा समावेश असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, २००८ मध्ये या पुरस्काराची प्रथम सुरुवात करण्यात आली असून, कृषी क्रांतीचे प्रणेते प्रा एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने सर्वात पहिल्यांदा हा पुरस्कार आंध्र प्रदेश या राज्याला प्रदान केला होता. आतापर्यंत या पुरस्काराने माजी कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, अखिलेश यादव, दिवंगत नेते प्रकाश सिंह बादल, वर्गीस कुरियन, एम एस स्वामीनाथन इत्यादी महानुभावांचा गौरव करण्यात आला आहे. २०२३ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार बिहार तर २०२२ चा तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

 

Web Title: best agricultural state 2024 award to maharashtra and cm eknath shinde shinde and dhananjay munde will attend ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.