अभिमानास्पद! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 05:41 AM2018-09-18T05:41:11+5:302018-09-18T06:44:37+5:30
प्रवाशांना विमानतळावर पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचा अभ्यास करून प्रवाशांद्वारे करण्यात आलेल्या शिफारशींनंतर हा पुरस्कार देण्यात आला.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून नुकतेच गौरवण्यात आले आहे. प्रवाशांना विमानतळावर पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचा अभ्यास करून प्रवाशांद्वारे करण्यात आलेल्या शिफारशींनंतर हा पुरस्कार देण्यात आला. एअरपोर्ट्स काऊन्सिल इंटरनॅशनल (एसीआय)द्वारे केलेल्या सर्वेक्षणामध्ये प्रवाशांनी मुंबई विमानतळाला चांगले गुण दिल्याने हा पुरस्कार देण्यात आला आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जैन यांनी याबाबतचा चषक स्वीकारला. कॅनडामध्ये झालेल्या कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला.
एसीआय ही हवाई वाहतूक क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असून जगातील १७८ देशांमध्ये १,९५३ विमानतळे त्याचे सहयोगी आहेत. हवाई प्रवाशांना समाधानकारक सेवा देऊन प्रवाशांना मिळणाºया सुविधांच्या आधारे ३४ मुद्द्यांवर संस्थेतर्फे जगातील विविध आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सर्वेक्षण करण्यात आले व त्यामध्ये मुंबई विमानतळाची सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड करण्यात आली. चेक इन, सुरक्षा तपासणी विश्रांतीगृह, रेस्टॉरन्टस व इतर मुद्द्यांचा यामध्ये विचार करण्यात आला होता.
मुंबई विमानतळावरील वाहतूक काही काळासाठी बंद
मु्ंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ९-२७ ही मुख्य धावपट्टी सोमवारी दुपारी पावणे दोन ते पावणे चारपर्यंत नियमित तपासणीसाठी बंद होती. या काळात मुख्य धावपट्टीवरील विमान वाहतूक १४-३२ या पर्यायी धावपट्टीवर वळवण्यात आली. यामुळे मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाºया २०९ विमानांना १३ मिनिटांचा तर येथे येणाºया विमानांना ३२ विमानांना सरासरी ५ मिनिटांचा विलंब झाला.