मुंबई : आर्थिक संकटात बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेत विलीन करण्याचे प्रयत्न आयुक्त अजोय मेहता यांच्या ताठर भूमिकेमुळे निष्फळ ठरले होते. मात्र, नवनियुक्त आयुक्त प्रवीण परदेशी यांनी तूट भरून काढण्यासाठी उपाययोजना करतानाच, उर्वरित तोट्याची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविलीे. खासगी बस चालविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.बेस्ट उपक्रमाला टाळे लागण्याची वेळ आल्यामुळे पालिकेने आपले पालकत्व स्वीकारावे, अशी मागणी बेस्ट कामगार संघटनांकडून होत आहे. बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेतच विलीन करण्याचा ठराव महासभेत मंजूर झाला. मात्र, पालिकेचे मावळते आयुक्त अजोय मेहता यांनी बेस्ट उपक्रमाला आर्थिक शिस्तीचे धडे दिले. यामुळे नवनियुक्त आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे बेस्ट कामगार व राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते.याबाबत विद्यमान आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली आहे. मात्र, बेस्ट उपक्रमाला खासगी बसचा आधार घ्यावा लागेल. तरीही उपक्रमातील मनुष्यबळ कमी करणार नाही, असे त्यांनी सांगितले. आर्थिक तूट भरून काढण्यासाठी उपाययोजना राबवू, असेही ते म्हणाले.
कामगार संघटनांशी चर्चा करून घेणार निर्णयखासगी तत्त्वावर चार ते पाच हजार बसगाड्या बेस्ट उपक्रमाला घ्याव्या लागतील. यामुळे संचित तोटा, नुकसान, खर्च कमी होण्यास मदत होईल. खासगी बसगाड्यांना कामगार संघटनांचा असलेला विरोध मोडीत काढण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे परदेशी म्हणाले.