बेस्ट कामगारांच्या संपाला तूर्तास स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 08:58 PM2018-02-14T20:58:55+5:302018-02-14T21:20:50+5:30

बेस्ट उपक्रमाने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बसगाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या खासगीकरणामुळे बेस्ट कामगार हवालदिल झाले आहेत.

BEST to be adjourned for the time being, will now be decided after March 5 | बेस्ट कामगारांच्या संपाला तूर्तास स्थगिती

बेस्ट कामगारांच्या संपाला तूर्तास स्थगिती

Next

मुंबई- बेस्ट उपक्रमाने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बसगाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या खासगीकरणामुळे बेस्ट कामगार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे बेस्ट संघटनांनी संपाचा इशारा दिला होता. मात्र बसगाड्या भाड्याने घेण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने औद्योगिक न्यायालयाने संपास मनाई केली आहे. त्यामुळे कामगार संघटनांनी तूर्तास संप स्थगित केला आहे.

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला कामगारांचे पगार देणेही अवघड झाले आहे. त्यामुळे अखेर महापालिकेच्या सुचनेनुसार तयार केलेल्या कृती आराखड्याप्रमाणे 1200 बसगाड्या भाड्याने घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 450 बसगाड्या भाड्याने घेण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने नुकतीच मंजुरी दिली. मात्र या खाजगीकरणामुळे बेस्ट कामगार संपेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

यामुळे पुकारला होता संप
या बसगाड्यांवर चालक ठेकेदाराचा असणार आहे. तसेच गाड्यांचे इंधन आणि देखभालची जबाबदारी संबंधित ठेकेदाराचीच असणार आहे. खाजगी गाड्या घेण्याचा निर्णय घेऊन बेस्टमध्ये खाजगीकरणास सुरुवात झाली आहे. यामुळे बेस्ट कर्मचारी कृती समितीने 15 फेब्रुवारीला संपाचा इशारा दिला होता. खाजगीकरणातून तूट वाढल्यास तो भार पालिकेने उचलावा, कामगारांच्या नोक-या अबाधित राहव्यात अशी संघटनांची मागणी आहे.

कृती समितीत फूट
पगारासाठी कामगार संघटनांनी गेल्या वर्षी 7 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या संपात शिवसेनासह सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या. मात्र बेस्टसाठी आयुक्तांकडून मोठा निधी मंजूर करून घेण्यास अपयशी ठरलेल्या शिवसेनेने खाजगीकरणाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यामुळे ऐनवेळी बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेतली. बेस्ट कर्मचारी कृती समितीत असलेल्या 12 संघटनांमध्ये फूट पडली होती.

बैठका ठरल्या निष्फळ
संप होऊ नये म्हणून बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सर्व युनियनची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत तोडगा न निघाल्याने पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज संध्याकाळी आपल्या दालनात याबाबत बैठक बोलावली होती. मात्र बेस्ट कामगारांच्या नोकरीवर गदा येणार नाही, असे लेखी आश्वासन आयुक्तांनी दिले नाही. त्यामुळे संघटनांनी संपाची तयारी सुरू केली होती.

न्यायालयाचे मनाई आदेश
कामगार संघटनेत संपावरून फूट पडल्याने कृती समिती द्विधा मन:स्थितीत होती. दरम्यान औद्योगिक न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असून 5 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे कामगार संघटनांनी संप करू नये तसेच बेस्ट प्रशासनाने तोपर्यंत बसगाड्या भाड्याने घेण्याचा करार करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे कामगार नेते शशांक राव यांनी कामगारांच्या मेळाव्यात संप न करण्याचा निर्णय जाहीर केला.

Web Title: BEST to be adjourned for the time being, will now be decided after March 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.