‘बेस्टला शिवसेनेची अखेरपर्यंत साथ’
By admin | Published: April 26, 2017 12:38 AM2017-04-26T00:38:37+5:302017-04-26T00:38:37+5:30
शिवसेना असेपर्यंत बेस्ट बंद करण्याचा विचारही कोणी मनात आणू नये. बेस्टसमोरील आर्थिक संकटातून सावरण्यास बेस्टचा कर्मचारी खंबीर आहे
मुंबई : शिवसेना असेपर्यंत बेस्ट बंद करण्याचा विचारही कोणी मनात आणू नये. बेस्टसमोरील आर्थिक संकटातून सावरण्यास बेस्टचा कर्मचारी खंबीर आहे. यासाठी मुंबई महापालिका व शिवसेना त्यांना अखेरपर्यंत साथ देईल, असा अप्रत्यक्ष इशारा शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी आज भाजपाला दिला.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या अनुदानातून बेस्टच्या ताफ्यात ३०३ बसगाड्या येणार आहेत. त्यापैकी पहिल्या ७५ बसगाड्यांचे उद्घाटन मंगळवारी वडाळा येथील बस आगारात झाले. या वेळी आदित्य ठाकरे बोलत होते. सध्या बेस्टची आर्थिक परिस्थिती हालाखीची असली तरी यापुढे आधुनिकतेची कास धरल्यास बेस्ट नक्कीच सावरू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बेस्ट लवकरच हायब्रीड आणि इलेक्ट्रिक बसगाड्या घेणार असून, एकात्मिक तिकीट प्रवास तसेच बेस्टच्या नव्या अॅपमुळे बेस्टची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, असेही आदित्य म्हणाले.
बेस्टला आर्थिक मदत देण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार बेस्टमार्फत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र हा आराखडा तयार करणारे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची राज्य सरकारने बदली केली आहे. त्यामुळे आदित्य यांनी आपल्या भाषणातून भाजपाला अप्रत्यक्ष इशारा दिला.
या बसगाड्यांसाठी १५० कोटींचा खर्च येणार असून, उर्वरित ५० कोटीही मुंबई महापालिकेने द्यावेत, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)