'बेस्ट'चा तिढा कायम, ऐन सणासुदीच्या काळात होणार मुंबईकरांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2017 04:02 PM2017-08-06T16:02:37+5:302017-08-06T16:05:48+5:30
बेस्टच्या संपाचा तिढा सोडविण्यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज घेतलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. बेस्ट कृती समिती आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम आहे.
मुंबई, दि. 6 - बेस्टच्या संपाचा तिढा सोडविण्यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज घेतलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. बेस्ट कृती समिती आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम आहे. आज मध्यरात्रीपासून 36 हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत . बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर बंगल्यात बैठक आयोजित केली होती. बैठकीला बेस्ट कामगार संघटना, 'बेस्ट'चे अध्यक्ष आणि महापौर उपस्थित होते.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या बैठकीनंतर तोडगा निघाल्याचे सांगितले होते. पगाराचा महत्वाचा प्रश्न सोडवला आहे. कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या 10 तारखेला पगार मिळणार. इतर मागण्या कालांतरानं सोडवणार असल्याचे अश्वासनही त्यांनी दिले होतं. पण बेस्ट कृती समितीनं आयुक्तांनी लेखी अश्वासन दिल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तिढा वाढलाच आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे मध्यस्थीची विनंती केली आहे.
आज झालेल्या बैठकीत तोडगा निघणे अपेक्षित होते. परंतु आजची ही बैठक निष्फळ झाली आहे. त्यामुळे बेस्टचा संप होणे अटळ असून, ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. महापौर दालनात पाच वेळा बैठका होऊनही बेस्टला आर्थिक मदत देण्याची मागणी रखडली आहे. बेस्ट कामगारांचा पगार महिन्याच्या दुस-या दिवशी करावा, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, महापालिकेने बेस्टला दिलेले कर्ज अनुदान जाहीर करावे, पालिका आकारत असलेल्या विविध करातून सूट मिळावी, बेस्ट उपक्रमाची सर्व जबाबदारी पालिकेने घ्यावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्टच्या १२ युनियनच्या कृती समितीने मंगळवारपासून उपोषण सुरू केले होते. तीन दिवस उपोषण सुरू असले तरी महापालिका किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने संपक-यांची भेट घेतलेली नाही.