Join us

बेस्ट मोठ्या आर्थिक संकटात; २०२१ - २०२२ चा १८८७.८३ कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 7:57 PM

विद्युत विभागही तुटीत

मुंबई: आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाचे कंबरडे लॉक डाऊनच्या काळात मोडले आहे. उत्पन्नात मोठी घट, महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानात कपात आणि वीज विभागही तोट्यात गेला आहे. परिणामी, सन २०२१ - २०२२ चा १८८७.८३ कोटी तुटीचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण शिंदे यांना शनिवारी सादर केला. बेस्ट समिती सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यावेळी सहभागी झाले होते.

बेस्ट उपक्रम गेल्या दशकापासून तुटीत असल्याने महापालिकेने तयार केलेल्या नियोजन आराखड्यानुसार बेस्टमध्ये अनेक बदल घडवण्यात येत होते. त्याप्रमाणे जुलै २०१९ पासून बेस्ट भाड्यात मोठी कपात करण्यात आल्यानंतर प्रवासी संख्या दुप्पट झाली. तसेच महापालिकेकडून आर्थिक बळ मिळत असल्याने ' बेस्ट ' दिवस येतील, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र कोरोना काळात लॉक डाऊनमुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्याचे परिणाम आता बेस्टच्या अर्थसंकल्पावरही दिसून येत आहेत.

विद्युत विभाग तोट्यात-

परिवहन विभाग तोट्यात असला तरी विद्युत पुरवठा विभाग बेस्टसाठी जमेची बाजू होती. मात्र आगामी आर्थिक वर्षात विद्युत पुरवठा विभागातही २६३.५९ कोटी रुपयांची तूट दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टचे आर्थिक गणित पुरते कोलमडले आहे. 

सन २०२२ पर्यंत ६३३७ चा बस ताफा-

सध्या ३८७५ बसगाड्यांचा ताफा बेस्ट उपक्रमाकडे आहे. यामध्ये १०९९ भाडेतत्वावरच्या बसगाड्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त तीनशे इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच ६०० एकमजली सीएनजी बसगाड्यांकरिता निविदा प्रक्रिया सुरु आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत बसचा ताफा ६३३७ इतका करण्याचे लक्ष्य बेस्ट प्रशासनाने ठेवले आहे. 

अचूक वेळ कळणार-

बस स्थानके, बस चौक्या, बस स्टॉप अशा एकूण ८०० ठिकाणी प्रवासी माहिती प्रणाली कार्यरत केली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना बस किती वेळात बस स्टॉपवर येईल, याची माहिती उपलब्ध होणार आहे. 

एक लाख वीज मीटर बसविणार-

बेस्ट उपक्रमाने गेल्या दोन वर्षांत दोन लाख इलेकट्रोनिक मीटर बसवले आहेत. येत्या वर्षात आणखी एक लाख इलेकट्रोनिक मीटर बसवले जाणार आहेत. २०२१ - २२ मध्ये ' स्वयंचलित वीजमापक पायाभूत प्रकल्प' या अंतर्गत फॉल्ट पॅसेज इंडिकेटर यासह एकत्रित केलेली वीज मापन पद्धती आणि उच्च विद्युत ग्राहकांकरिता २० हजार स्मार्ट वीजमापकांची संच मांडणी करण्याचे प्रस्तावित आहे. 

आकडेवारी कोटीमध्ये-

विद्युत पुरवठा विभाग

उत्पन्न    ३५३२.३०खर्च    ३७९५.८९तोटा    २६३.५९

परिवहन विभाग

उत्पन्न     १४०७.००खर्च    ३०३१.२४तूट    १६२४.२४

संपूर्ण    उपक्रम

उत्पन्न ४९३९.३०खर्च    ६८२७.१३तूट    १८८७.८३

टॅग्स :बेस्टमुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस