मुंबई: आर्थिक संकटातील बेस्ट उपक्रमाने यंदाही सानुग्रह अनुदानासाठी तरतूद केलेली नाही. मात्र, पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने सानुग्रह अनुदानासाठी राजकीय धावपळ सुरू झाली आहे. थेट मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने बोनसचे श्रेय खिशात घालण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच वेळी शिवसेनेच्या संघटनेने संपाचे हत्यार उपासून ‘मातोश्री’च्या हस्तक्षेपाने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळवून देण्याची तयारी केली आहे. बोनसच्या मुद्द्यावरून युतीत ‘बेस्ट’ लढाईची चिन्हे आहेत. १९७०-१९७१ पासून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची प्रथा बेस्टमध्ये आहे. मात्र, आर्थिक समस्येमुळे गेली दोन-तीन वर्षे ही प्रथा खंडित झाली. पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने बोनस नाकारून प्रशासन कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत असल्याचा साक्षात्कार राजकीय पक्षांना यंदा झाला आहे. त्यामुळे काही करा, पण बोनस द्या, अशी एकमुखी मागणी बेस्ट समितीच्या बैठकीत आज झाली. बेस्टचे अध्यक्षपद भाजपाकडे असल्याने, बोनस मिळवून देऊन भाजपाचा नाकर्तेपणा शिवसेनेला दाखवून द्यायचा आहे. मित्रपक्षाची कोंडी करण्यासाठी बेस्ट बंद करण्याचा इशारा बेस्ट कामगार सेनेचे पदाधिकारी सुहास सामंत यांनी बैठकीत दिली. बोनसबाबत महापौर स्नेहल आंबेकर यांची कामगार संघटनांनी आज भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर असो किंवा ‘मातोश्री’वर, कर्मचाऱ्यांचा बोनस द्या, असा टोला सामंत यांनी लगावला, तर बोनस देण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये मंजूर करून नंतर निधी उपलब्ध करण्याची सूचना बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर यांनी केली, तसा ठरावही बेस्ट समितीत मंजूर झाला. मात्र, बेस्ट आर्थिक संकटात असून पैसा नाही, अशी हतबलता बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
बोनससाठी ‘बेस्ट’ चढाओढ
By admin | Published: October 14, 2016 7:01 AM