‘बेस्टच्या ‘क’ अर्थसंकल्पाचे विलीनीकरण ‘अ’ अर्थसंकल्पात करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 02:23 AM2018-06-30T02:23:06+5:302018-06-30T02:23:08+5:30
मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या ‘क’ अर्थसंकल्पाचे विलीनीकरण ‘अ’ अर्थसंकल्पात करण्याची मागणी करत बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने शुक्रवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या ‘क’ अर्थसंकल्पाचे विलीनीकरण ‘अ’ अर्थसंकल्पात करण्याची मागणी करत बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने शुक्रवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. या वेळी संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांची भेट घेतली. त्यात पाटील यांनी सकारात्मकपणे मागणी ऐकून घेत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत यासंदर्भात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिली.
राव म्हणाले, बेस्ट उपक्रम अडचणीत असून, मुंबईकरांना यापुढेही निरंतर बेस्टची सेवा हवी असेल, तर महापालिकेचा ‘क’ अर्थसंकल्प ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याची गरज आहे. तसा ठरावही बेस्ट समितीने १४ आॅगस्ट २०१७ रोजी मंजूर केलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने २६ आॅक्टोबर २०१७ रोजी या ठरावाला सर्वानुमते मान्यता दिली आहे. मात्र, या मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका कायदा १८८८मध्ये तशी सुधारणा करणे आवश्यक आहे. म्हणूनच नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी कृती समितीने केली आहे.
राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी या मागणीबाबत सकारात्मक चर्चा केल्याचेही राव यांनी सांगितले. तसेच हिवाळी अधिवेशनापर्यंत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासित केले. मात्र, पावसाळी अधिवेशनातच नागपूर येथे बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याची मागणी संघटनेने केल्याचे राव यांनी स्पष्ट केले.