बेस्ट बस (BEST Bus) मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखली जाते. पण बेस्टच्या याच बसेस आता भर रस्त्यात बंद पडत असल्याच्या घटनांनी मुंबईकर पुरते वैतागले आहेत. तशी आकडेवारीच आता समोर आली आहे. जानेवारी ते जून या कालावधीत मुंबईत बेस्ट बस बंद पडण्याच्या (BEST Bus Breakdowns) २११ घटनांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ७५ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे आता बेस्ट बसच्या मेंटेनन्सचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबईत जिथं लोकल सेवा पोहचू शकत नाही अशा ठिकाणी बेस्ट बस मुंबईकरांसाठी स्वस्त आणि सोयीचा पर्याय ठरतो. पण इच्छित ठिकाणी जात असतानाच रस्त्यातच बस बंद पडली तर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. कधी कधी तर थेट हायवेवरच प्रवाशांना उतरावं लागतं आणि इतर वाहनांची सोय करुन पुढचा प्रवास करावा लागतो.
गेल्या वर्षी अशा बस ब्रेकडाऊनच्या एकूण १२० घटना घडल्या होत्या. पण यंदा फक्त सहा महिन्यांतच २११ घटनांची नोंद झाली आहे. यंदा सर्वाधिक बस बंद पडण्याची घटना वाकोला येथे घडली आहे. वाकोला परिसरात तब्बल ५६ वेळा बस ब्रेकडाऊनच्या घटना घडल्या आहेत.
बस ब्रेकडाऊन झाली की अशावेळी प्रवाशांच्या मदतीला पहिलं धावून येतात ते म्हणजे वाहतूक पोलीस. बंद पडलेली बस तत्काळ टोइंग व्हेइकलनं कशी बाजूला करुन ट्राफिक मोकळं करता येईल यासाठी ते प्रयत्न करतात. तसंच प्रवाशांनाही बसमधून सुखरुप खाली उतरण्यास मदत करतात. तसंच एखाद्या घटनेत प्रवासी जखमी झाले असतील तर त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासही मदत करतात.
वाहतूक पोलिसांकडून बेस्ट प्रशासनाला बस बंद पडण्यासंदर्भात एक पत्र देखील लिहिलं आहे. पोलीस प्रशासनाने पत्रात नमूद केलं की, "बस बंद पडली की ती टोइंग करण्यासाठी योग्य क्षमतेची क्रेन उपलब्ध करुन देणं खूप अडचणीचं असतं. त्यात इलेक्ट्रिक बस असेल तर टेक्निशिअन घटनास्थळी आल्याशिवाय काहीच करता येत नाही"
बेस्टच्या ताफ्यात सध्या ३१३३ बसेस आहेत. त्यात ६१६ इलेक्ट्रिक, १९९२ सीएनजी आणि ५२५ डिझेलवर धावणाऱ्या आहेत. "बेस्टचे व्यवस्थापन पथक आणि क्रेन्स वेगवेगळ्या ठिकाणी सज्ज असायला हवेत. ही पथकं एकतर बेस्टच्या दोन झोनमध्ये (दक्षिण-मध्य आणि पूर्व-पश्चिम) किंवा मग पाच पोलीस हद्दीत (उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि मध्य) तैनात असावीत", असं वाहतूक विभागाचे सह आयुक्त अनिल कुंभारे यांनी सांगितलं.
दुसरीकडे बेस्ट वर्कशॉपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेस्टकडे टोइंग आणि दुरुस्तीसाठीच्या योग्य सुविधा उपलब्ध आहेत असं म्हटलं आहे. ते म्हणाले, "आमच्याकडे सात ब्रेकडाऊन व्हॅन्स आणि बस टोइंगसाठी दोन वाहनं आहेत. त्यासोबतच आमच्याकडे बस कंट्रोल सेक्शन असून त्यात व्यवस्थापनासाठी पूर्णवेळ पथक आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात बऱ्याच कंत्राटी पद्धतीवरच्या गाड्या आहेत ज्या ब्रेकडाऊन होतात. त्यामुळे आम्ही खासगी ऑपरेटर्सना देखभाल दुरुस्तीसाठी अतिरिक्त कर्मचारी आणि वाहनं उपलब्ध करुन देण्यास सांगितलं आहे"