दादरमध्ये बसची डंपरला जोरदार धडक; आठ जण जखमी, भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 03:24 PM2021-10-27T15:24:55+5:302021-10-27T15:27:54+5:30
नियंत्रण सुटल्यानं बेस्ट बसचा अपघात; डंपरला मागून जोरदार धडक
मुंबई: दादरमध्ये बसला मोठा अपघात झाला. ही बस मरोळ आगाराची असल्याची माहिती समोर आली आहे. या बसनं दादरमध्ये सकाळी एका डंपरला जोरदार धडक दिली. या अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये वाहक, चालकांचा समावेश आहे. जखमी झालेल्या ८ जणांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आलं आहे. या फुटेजमध्ये अपघाताची तीव्रता दिसून येत आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसनं डंपरला मागून जोरदार धडक दिली. बसने समोरील कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. बसच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झालं. काचांचा चक्काचूर झाला. यामध्ये बस वाहक, बस चालक आणि सहा प्रवासी जखमी झाले. वाहक, चालक आणि तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. तर तीन प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
मुंबई: दादरमध्ये बेस्ट बसची डंपरला मागून जोरदार धडक; आठ जण जखमी; अपघात सीसीटीव्हीत कैद https://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/F9W6iUF8Vf
— Lokmat (@lokmat) October 27, 2021
अपघातातील जखमींची नावं-
१. राजेंद्र (५३ वर्षे)- चालक, गंभीर जखमी
२. काशीराम धुरी (५७ वर्षे)- चालक, गंभीर जखमी
३. ताहीर हुसेन (५२ वर्षे)- प्रवासी, गंभीर जखमी
४. रुपाली गायकवाड (३६ वर्षे)- प्रवासी, गंभीर जखमी
५. सुलतान (५० वर्षे)- प्रवासी, गंभीर जखमी
६. मंसूर अली (५२ वर्षे)- प्रवासी, प्रकृती स्थिर
७. श्रवणी म्हस्के (१६ वर्षे)- प्रवासी, प्रकृती स्थिर
८. वैदैही बामणे (१७ वर्षे)- प्रवासी, प्रकृती स्थिर