लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दादर टी.टी. खोदादाद सर्कल येथे बेस्ट उपक्रमाच्या तेजस्विनी बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या डंपरला गेल्या आठवड्यात धडक दिली होती. या दुर्घटनेत गंभीर जखमी वाहकाचा सोमवारी रात्री शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात मृत्यू झाला. याआधी चालकाचा मृत्यू झाला होता. तर आठ प्रवासी जखमी झाले होते.
दादर टी. टी. खोदादाद सर्कल येथे २७ ऑक्टोबर रोजी तेजस्विनी बसच्या चालकाने सिग्नलवर उभ्या असलेल्या डंपरला मागून भरधाव वेगात येऊन धडक दिली होती. या दुर्घटनेत बस चालक आणि वाहकासह एकूण दहाजण जखमी झाले होते. त्यापैकी गंभीर जखमी चालक राजेंद्र काळे यांचा शुक्रवारी सकाळी सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर वाहक काशिराम धुरी (५७) यांचा सोमवारी रात्री उशिरा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जखमींपैकी तीन महिला, बस चालक आणि वाहक यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. यापैकी पाच प्रवाशांना डिस्चार्ज मिळला असून एकावर अद्याप उपचार सुरू आहेत. सीसीटीव्हीमधून मिळालेल्या रेकॉर्डनुसार या बसची डंपरवरील धडक एवढी जबरदस्त होती, की बसच्या दरवाज्याजवळ असलेला प्रवासी रस्त्यावर फेकला गेला. काही प्रवाशांनी बाहेर उडी मारली. या दुर्घटनेत जखमी प्रवाशांच्या उपचाराचा खर्च बेस्टने उचलला आहे.