बेस्ट बसचालकाचा हलगर्जीपणा, प्रवाशाची बोटे तुटली!
By गौरी टेंबकर | Published: March 29, 2023 02:27 PM2023-03-29T14:27:15+5:302023-03-29T14:27:46+5:30
बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची दोन बोटे तुटली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची दोन बोटे तुटली. हा सगळा प्रकार चालकाच्या निष्काजीपणाने गाडी चालवल्याने घडला असून याप्रकरणी पवई पोलिसांनी तुकाराम यशवंत बाबर (५५) या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार संतोष गवई (३३) हे हाउसकीपिंगचे काम करत असून आरेच्या फिल्टर पाडा परिसरात त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गवई हे १६ मार्च रोजी सकाळी ९ च्या सुमारास कांजूरमार्ग वरून पवईला येण्यासाठी बेस्ट बस रूट क्रमांक ४२५ मध्ये भांडुपच्या मंगतराम पेट्रोल पंप ते यारी रोड या गोरेगाव मार्गावरील बसमध्ये चढले. जास्त गर्दी नसल्याने ते बसच्या मागच्या दाराजवळ उभे होते. त्यावेळी ती बस पवई गेट वे प्लाझा या ठिकाणाहून जाताना रस्त्याच्या बाजूला लावलेल्या मेट्रोच्या लोखंडी बॅरिगेट्सला घासत च बाबरने पुढे नेली. त्यामुळे त्या बेरिगेट्सला असलेला पत्रा गवई यांच्या डाव्या हाताची करंगळी आणि त्याच्या बाजूच्या बोटाला लागून ती कापली गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.
वेदनेने गवई कळवळू लागले त्यावेळी बसच्या वाहकाने तातडीने त्यांना हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यानंतर तिथून त्यांना परळच्या केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. मी स्वच्छता कर्मचारी असून चालकाच्या हलगर्जीपणामुळे आज माझी दोन्ही बोटे कापली गेली. त्यामुळे हलगर्जीपणाने बस चालवत प्रवाशाचा जीव धोक्यात घालणाऱ्या सदर चालकावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी गवई यांनी लोकमतशी बोलताना केली आहे. दरम्यान त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"