बेस्ट चालकाने मूकबधिराला नेले फरफटत; गोरेगावच्या आरे परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 01:25 PM2023-06-10T13:25:03+5:302023-06-10T13:27:32+5:30
चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गोरेगावच्या आरे कॉलनीत राहणारे मूकबधिर व्यक्ती बाबासाहेब प्रधान (५२) यांना बेस्ट बसचालकाने फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. त्यानुसार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक करत आहेत.
प्रधान हे आरेच्या युनिट क्र. २२ मध्ये पत्नी, मुलगा आणि सुनेसोबत राहतात. खासगी वाहनचालक म्हणून काम करणारा त्यांचा मुलगा विकास याने दिलेल्या माहितीनुसार, प्रधान हे जन्मत:च पूर्णपणे मूक आणि बधिर असून, मरोळ पोलिस कॅम्प परिसरात ते माळीकाम करतात. ते नेहमीप्रमाणे ६ जूनला सकाळी ११ वाजता कामावर निघाले. काही वेळाने विकास यांना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने वडिलांचा रिलायन्स येथे अपघात झाल्याचे कळवत सेवन हिल्स रुग्णालयात बोलावले. त्यानुसार विकास लहान भाऊ विकाससोबत रुग्णालयात पोहोचले.
तिथून गंभीर जखमी झालेल्या वडिलांना कूपर रुग्णालयात हलवत अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. अपघातामध्ये प्रधान यांच्या पायाच्या मांडीला आणि गुडघ्याला फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी आरे पोलिसांनी घटनास्थळी बेस्टचालक संतोषला अटक केली.
तीन वेळा पायावर घातली बस!
प्रधान यांचा शेजारी तसेच प्रत्यक्षदर्शी रोहित शिरसाट याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, युनिट २२ येथून रूट क्रमांक १८६ मधून मरोळ कॅम्पला जाताना रिलायन्स बस स्टॉपजवळ ट्रॅफिक असल्याने बस थांबली होती. या बसमध्ये गर्दी असल्याने प्रधान उतरले, तितक्यात चालकाने बस सुरू केली. त्याचा धक्का लागल्याने ते बसला अडकून फरफटत गेले. लोकांची आरडाओरड ऐकून चालकाने बस थांबवली व शिरसाटने बस क्रमांक लिहून घेतला. चालकाने तीन वेळा वडिलांच्या पायावर बस घातल्याचा आरोप विकास यांनी केला.