Join us

बसच्या तिकीट दरात उद्यापासून वाढ होण्याची शक्यता, मुंबईकरांच्या खिशाला कात्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 6:51 PM

बसने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

मुंबई- बेस्ट उपक्रमाला वाचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार प्रवासी भाड्यात वाढ करण्यास मुंबई महानगर प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणानेही (एमएमआरटीए) हिरवा कंदिल दाखविला आहे. त्यानुसार बुधवारी मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू हाेत आहे. त्यानुसार पहिल्या चार किलो मीटर पर्यंत बस भाड्यात कोणतीही वाढ नाही. त्यानंतर सहा ते ३० किलो मिटरपर्यंत एक ते १२ रुपये अशी भाडेवाढ असणार आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही या दरवाढीचा फटका बसणार आहे. 

आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्टने काटकसरीच्या उपाययोजना केल्यास मदत करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने दाखविली आहे. त्यानुसार कामगारांचे भत्ते गोठवणे, बस भाड्यात वाढ, अनेक योजना बंद करण्याची शिफारस या कृती आराखड्यात करण्यात आली होती. या आराखड्याची अंमलबजावणी केल्यास ५०४ काेटी १८ लाख रुपये बचत होईल असा दावा बेस्टने प्रशासनाने केला आहे. या प्रस्तावाला बेस्ट समिती, पालिकेतील स्थायी समिती आणि महासभेची मंजुरी मिळाली आहे. 

अशी आहे वाढ

बेस्टच्या दैनंदिन बस पासमध्येही ७० ते ९० रुपयांची वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या बसपासमध्ये ५० रुपयांची वाढ आहे. वातानुकूलित बसच्या तिकीटांत किमान पाच रुपयांची वाढ आहे. बेस्टने काही दिवसांपूर्वीच बोरीवली, ठाणे, मुलुंड आणि खारघर ते वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यान सुरू केलेल्या बसच्या तिकीटांमध्येही वाढ करण्यात आली आहे. बेस्टची दरवाढ करताना एमएमआरटीएची मंजुरी आवश्यक असते. ही अंतिम मंजुरीही आज झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत मिळाली आहे. 

 

चौकट 

* सन २०१८-२०१९ चा ८८० काेटी ८८ लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीने सादर केला आहे. 

 

प्रस्तावित भाड़ेवाढ पुढीलप्रमाणे 

साधी बस भाड़ेवाढ (आकडेवारी रुपयांमध्ये )

किमी ......सध्याचे भाडे...प्रस्तावित भाडे.... एसी

२............. ८............... .८..........   २०

४............. १०............ १०.........   २५

६............ १४...........१५..........३०

८.............१६...........१८..........३५

१०..........१८............२२.......... ४०

१२..........२०............२५..........४५

१४..........२२............२८.....  ५० 

२०..........२६............३४..........६५ 

३०..........३०............४२.........९५

 

शालेय बस पास 

 

                 मासिक   त्रैमासिक   वार्षिक 

 

पाचवी पर्यंत            200        600        1000

 

सहावी ते दहावी       250        750        1250

 

11, 12 वी पदविका   350      1050       1750