मुंबईत धावणार भाडेतत्त्वावरील ‘बेस्ट’ बसगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 05:13 AM2019-02-28T05:13:44+5:302019-02-28T05:13:52+5:30
बेस्ट समितीकडून प्रस्तावावर शिक्कामोर्तब : खासगीकरणाचे द्वार झाले खुले
मुंबई : खासगी बसगाड्या भाड्याने घेण्याचा विरोध डावलून या प्रस्तावावर बेस्ट समितीमध्ये बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार ‘फेम इंडिया’अंतर्गत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात बिगर वातानुकूलित आणि वातानुकूलित अशा प्रत्येकी २० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाच्या खासगीकरणाचे द्वार खुले झाले आहे.
बेस्ट उपक्रमाची तूट दरवर्षी वाढत असल्याने भाड्याने बसगाड्या घेण्याची शिफारस महापालिकेने केली होती. त्यानुसार बेस्ट प्रशासनाने प्रस्ताव तयार केला. परंतु, बेस्टमधील मान्यताप्राप्त संघटनेने या प्रस्तावाला विरोध करीत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे या बसगाड्यांचा प्रस्ताव लांबणीवर पडला होता. बसगाड्या भाड्याने घेण्यासाठी ‘फेम इंडिया’मार्फत मिळणारी ७० टक्के आर्थिक मदत ३१ मार्चपर्यंतच वापरण्यात येणार आहे. या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंजुरी द्यावी, अशी विनंती महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट समिती सदस्यांना केली.
मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने प्रस्ताव मंजूर केल्यास उच्च न्यायालयाचा अवमान होईल, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी निदर्शनास आणले. न्यायालयाने जाब विचारल्यास महाव्यवस्थापकांनी त्याची जबाबदारी घ्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. परंतु, केंद्रातून मिळणारा निधी वापरण्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यानंतर हा निधी वाया जाणार असल्याने बेस्ट उपक्रमाची बाजू मुख्य न्यायाधीशांसमोर मांडण्यात येईल, न्यायालयीन निर्णयाच्या अधीन
राहून या प्रस्तावाची अंमलबजावणी केली जाईल, अशी हमी महाव्यवस्थापकांनी दिल्यानंतर बेस्ट समितीने या प्रस्तावाला मंजुरी
दिली.
ताफ्यात येणार २० गाड्या
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात बिगर वातानुकूलित आणि वातानुकूलित मिळून प्रत्येकी २० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येतील. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला काहीसा आधार मिळणे शक्य होणार आहे. सोबतच बेस्टच्या खासगीकरणाचे द्वारही खुले झाले आहे.