Mumbai Best Bus Accident: "तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 12:47 PM2024-10-09T12:47:12+5:302024-10-09T12:48:40+5:30
Mumbai Best Bus Accident: मित्रांसह रस्ता ओलांडत असताना बेस्टच्या वांद्रे डेपो ते टाटा कॉलनी मार्गावरील ५९९ क्रमांकाच्या बसने मोहम्मदला धडक दिली.
मुंबईच्या वांद्रे पूर्व भागात बेस्ट बसनं एका शाळकरी मुलाला धडक दिल्याची घटना घडली. यात १२ वर्षीय मोहम्मद अरबाज शकील अन्सारी या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. इयत्ता सहावीत शिकणारा मोहम्मद वांद्रे कॉलनी परिसरातील कार्डिनल ग्रेशिअस शाळेतून नेहमीप्रमाणे आपल्या वर्गातील मित्रांसोबत घरी परत येत होता. मित्रांसह रस्ता ओलांडत असताना बेस्टच्या वांद्रे डेपो ते टाटा कॉलनी मार्गावरील ५९९ क्रमांकाच्या बसने मोहम्मदला धडक दिली.
मोहम्मदला धडक बसल्याचे लक्षात आल्यानंतर बस चालकानं ब्रेक लावला आणि त्याला पाहण्यासाठी तो खालीही उतरला होता. मोहम्मद गंभीर जखमी झाल्याने बस कंडक्टरने त्याला तातडीने रिक्षातून व्हीएन देसाई पालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान मोहम्मदचा मृत्यू झाला. अपघातानंतर एका प्रत्यक्षदर्शीनं मोहम्मदच्या आयडी कार्डवर असलेल्या त्याच्या वडिलांच्या मोबाइल नंबरवर कॉल केला होता.
मोहम्मदचे वडील शकील अन्सारी एका कपड्याच्या दुकानात टेलरिंगचं काम करतात. तुमच्या मुलाला बसने उडवलंय. तातडीने या असं कळवलं होतं. वडील शकील अन्सारी तातडीने रुग्णालयात पोहोचले. पण त्यांचा चिमुकला वाचू शकला नाही. मोहम्मदच्या घरापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावरच ही घटना घडली.
४५ वर्षीय बेस्ट चालक विजय बागल याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०६ अन्वये (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि कलम २८१ म्हणजेच रॅश ड्रायव्हिंग अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत आता चालकाची चौकशी केली जात आहे. या घटनेत अन्सारी कुटुंबीयांना आपल्या १२ वर्षीय चिमुकल्याला गमवावं लागल्यानं याची हळहळ व्यक्त केली जात आहे.