बेस्ट बसमधील टिकटिक पुन्हा थांबणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:43 AM2019-05-09T06:43:42+5:302019-05-09T06:43:51+5:30
ई तिकिटांचे नादुरुस्त मशीन आणि त्याचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द झाल्यानंतर गेले वर्षभर बेस्ट बसगाड्यांमध्ये टिक टिक ऐकू येत होती. वाहक कागदी तिकीट पंच करून प्रवाशांना देताना दिसत होते.
मुंबई - ई तिकिटांचे नादुरुस्त मशीन आणि त्याचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द झाल्यानंतर गेले वर्षभर बेस्ट बसगाड्यांमध्ये टिक टिक ऐकू येत होती. वाहक कागदी तिकीट पंच करून प्रवाशांना देताना दिसत होते. मात्र काही मशीन दुरुस्त करून घेण्यात बेस्ट प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे ई तिकिटांबरोबरच ई पर्स, मासिक बसपासचे नूतनीकरण व नवीन पास घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सन २०११मध्ये बेस्टने अत्याधुनिक पद्धतीने तिकिटांची छपाई सुरू केली. मात्र संबंधित कंपनीने पुरविलेल्या मशीन नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हे कंत्राट बेस्ट प्रशासनाने गुंडाळले. कंपनीला मुदतवाढ न देता स्वत: ही यंत्रणा हाताळण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला. मात्र नादुरुस्त यंत्र आणि बेस्टकडे ठोस उपाय नसल्यामुळे जुन्या पद्धतीने कागदी तिकिटे देण्यास बेस्टने सुरुवात केली.
मधल्या काळात कागदी तिकिटे संपल्यामुळे पुन्हा नवीन तिकिटांची छपाई महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी त्यांच्या अधिकारात करून घेतली. अखेर जवळपास वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर चार हजार मशीन दुरुस्त करण्यात आल्या आहेत.
फुकट्यांना पकडणे शक्य
बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज सुमारे २५ लाख प्रवासी प्रवास करीत असतात. या प्रवाशांना पुन्हा एकदा मासिक बसपासचा लाभ घेता येणार आहे. कागदी तिकिटांची छपाई बंद करीत २०११ मध्ये बेस्ट उपक्रमात ई तिकीट प्रणाली आणण्यात आली होती. या प्रणालीअंतर्गत बेस्ट उपक्रमाकडे साडेनऊ हजार मशीन आहेत. सध्या चार हजार मशीन दुरुस्त करण्यात आल्या आहेत. मशीन नादुरुस्त असल्याने मासिक बसपासची वैधता तपासणे शक्य होत नव्हते. याचा फायदा उठवून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. या फुकट्या प्रवाशांना पकडणे आता शक्य होणार आहे.