BEST बस करणार हवेच्या शुद्धतेचे काम; प्रायोगिक तत्त्वावर १५ बसमध्ये एअर प्युरिफायर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 06:29 AM2023-12-03T06:29:10+5:302023-12-03T06:29:33+5:30
पुढील महिन्यात ३५० बसचे लक्ष्य
मुंबई - शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होण्याचा धोका अधिक असतो. वाहनातील इंधनातून निघणारा हानिकारक धूर प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने सुरुवातीला बेस्टच्या १५ बसमध्ये धूर फिल्टर मशिन बसविण्यात आल्या आहेत. यानंतर पुढील महिन्यात एकूण ३५० बसमध्ये धूर फिल्टर मशिन बसविण्यात येणार आहे. नव्याने घेण्यात येणाऱ्या बसमध्ये कंपनीतून मशिन बसविण्यात येणार आहेत.
मुंबईतील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी याआधीच पालिकेकडून २७ मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. या सूचनांचे पालन करणे विकासक व प्रशासन दोघांना बंधनकारक असणार आहे. दरम्यान, याआधीच मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोटार ब्लोअर युनिट, फिल्टर
विषारी वायू रोखण्यासाठी मोटार ब्लोअर युनिट आणि हेपा फिल्टरची सोय आहे. ही उपकरणे ३५० बसवरही कार्यन्वित करण्यात येऊन किमान सार्वजनिक वाहतुकीतून होणाऱ्या प्रदूषणावर अंशतः नियंत्रण शक्य होईल, असा विश्वास बेस्टकडून व्यक्त होत आहे.