मुंबई : बेस्ट बसगाड्यांचा ताफा आयुर्मानामुळे कमी झाल्याने, प्रवाशांना बस थांब्यावर तासन्तास तिष्ठत राहावे लागत आहे. बसखरेदीसाठी आणखी आर्थिक मदत पुरविण्यास पालिका प्रशासन तयार नाही. त्यामुळे ११८ बस गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याची वेळ बेस्टवर आली. मात्र, बेस्ट कामगारांच्या संपात महापालिकेने मदतीचे आश्वासन दिल्याने, बसखरेदीसाठी ५६ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे फेरविचारासाठी पाठविण्याचा निर्णय बेस्ट समितीने घेतला आहे.बेस्टच्या आर्थिक परिस्थितीमुळे गेल्या तीन-चार वर्षांत नवीन बसगाड्या खरेदी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे बसखरेदीसाठी बेस्टने पालिका प्रशासनाकडे आर्थिक मदत मागितली होती. त्यानुसार, बेस्टला शंभर कोटी अनुदान देण्याचे स्थायी समितीमधील अर्थसंकल्पीय चर्चेत निश्चित करण्यात आले.या बसगाड्यांसाठी बेस्टने निविदा प्रक्रिया राबवून ३०३ बस घेण्यासाठी टाटा कंपनीकडे नोंदणी केली, तर १०० कोटींपैकी १० कोटी रुपये इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी मंजूर करण्यात आले. या रकमेतील ९० कोटींमध्ये १८५ बसगाड्याच बेस्टने खरेदी केल्या, तरीही आणखी ११८ बसगाड्यांसाठी बेस्टला ५६ कोटींची आवश्यकता होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही पालिका आयुक्तांनी बेस्टच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.उर्वरित बसगाड्या घेण्याची आर्थिक क्षमता नसल्याने, नाइलाजास्तव बेस्टला बसखरेदी रद्द करावी लागली. मात्र, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी हा प्रस्ताव फेरविचारासाठी पालिका आयुक्तांकडे पाठविण्याचे आदेश बेस्ट महाव्यवस्थापकांना दिले आहेत.बसगाड्यांची संख्या रोडावल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेने बेस्टला बसगाड्यांसाठी आर्थिक सहाय्य करून प्रवाशांचा प्रवास सुकर करावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. कामगार संघटनांचीही हीच अपेक्षा आहे.>तेजस्विनी योजनेचा लाभराज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेंतर्गत मिळणाºया ११ कोटींचा निधी टाटाच्या उर्वरित बसगाड्या खरेदी करण्यासाठी वापरण्यात यावा, असा सल्ला बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत यांनी दिला.>जकात कर माफ करावाबेस्टकडून नवीन बसखरेदीपोटी घेतलेले जकातीचे व इतर कर मिळून असे एकूण २६ कोटी रुपये पालिकेने माफ करावे. ते पैसे नवीन बस खरेदीसाठी द्यावेत, अशी सूचना विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी केली.>आयुक्तांचे कानावर हातपालिका आयुक्त अजय मेहता काही ऐकण्याच्या तयारीत नसल्याने, नवीन बसगाड्यांपैकी ११८ बसखरेदी करणे शक्य नसल्याचे बेस्ट प्रशासनाने समितीच्या निदर्शनास आणले.
बसखरेदीसाठी बेस्टची महापालिकेकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 1:46 AM