आॅलिम्पिक विजेत्या सिंधूचे ‘बेस्ट’ सारथी
By Admin | Published: August 28, 2016 03:40 AM2016-08-28T03:40:17+5:302016-08-28T03:40:17+5:30
रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या पी.व्ही. सिंधूचा भव्य सत्कार आंध्र प्रदेश व तेलंगणा सरकारने केला. सत्कारापूर्वी निघालेल्या रॅलीसाठी खास मुंबईवरून बेस्टची
- नामदेव मोरे, नवी मुंबई
रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या पी.व्ही. सिंधूचा भव्य सत्कार आंध्र प्रदेश व तेलंगणा सरकारने केला. सत्कारापूर्वी निघालेल्या रॅलीसाठी खास मुंबईवरून बेस्टची निलांबरी बस पाठविण्यात आली होती. या ऐतिहासिक सोहळ्यात बेस्टचे सारथ्य केले ते नवी मुंबईमधील रहेमान किसन चौघुले व राजेंद्र तोडकर यांनी. विश्वविजेतीच्या सत्कारासाठी तब्बल २२०० किलोमीटर अंतर प्रवास करणाऱ्या या बेस्ट चालकांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
यंदा रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या साक्षी मलिक आणि पी.व्ही. सिंधू यांचा नागरी सत्कार करण्याचा निर्णय देशवासीयांनी घेतला. सिंधू २२ आॅगस्टला सकाळी ९ वाजता हैदराबाद विमानतळावर पोहोचणार होती. तिची भव्य रॅली काढण्याचा निर्णय आंध्र प्रदेश सरकारने घेतला. यासाठी बेस्टच्या निलांबरी बसमधूनच सिंधूची मिरवणूक काढण्याचे ठरविले. २० आॅगस्टला बेस्ट प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. प्रशासनाने होकार दिला व रात्री १० वाजता दक्ष चालक रहेमान किसन चौघुले व राजेंद्र तोडकर यांना फोन करून पहाटेच वडाळा डेपोत येण्याच्या सूचना केल्या.
हे दोन्ही चालक पहाटे ५ वाजता डेपोत गेले व सकाळी ९ वाजता निलांबरी घेऊन प्रवासाला निघाले. ७३५ किलोमीटर अंतर न थांबता पार करून बस वेळेत हैदराबादला पोहोचविली. बसची सजावट होईपर्यंत रॅलीच्या ३० किलोमीटरचे अंतर दोन्ही चालकांना दाखविण्यात आले. सकाळी ९ वाजता हैदराबाद विमानतळावरून निघालेली रॅली दीड वाजता सत्कार समारंभाच्या ठिकाणी पोहोचली. या रॅलीत खेळाडूंसोबतच बेस्ट बसनेही सर्वांचे लक्ष वेधले होते.
भव्य सत्कारामुळे तत्काळ दुसऱ्या दिवशी तेलंगणा सरकारनेही सिंधूचा नागरी सत्कार करण्याचे निश्चित
केले व बेस्टची बस पाठविण्याची विनंती प्रशासनास केली. अधिकाऱ्यांनी तत्काळ चौघुले व तोडकर यांना तेथून विजयवाडाला जाण्याविषयी सूचना केली. ३०० किलोमीटर अंतर पूर्ण करून बस रात्री दीड वाजता विजयवाडाला पोहोचली. अविश्रांत ४७ तासांच्या जागरणानंतर दोन्ही चालकांनी तीन तास विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशीची २० किलोमीटरची रॅली पूर्ण करून दोन्ही बेस्ट सारथी निलांबरी घेऊन पुन्हा मुंबईत परतले.
- आॅलिम्पिकमध्ये देशाला
रजतपदक मिळवून देणाऱ्या खेळाडूच्या स्वागतासाठी
दोन्ही चालकांनी तब्बल २२०० किलोमीटर बस चालविली. यामधील पहिले ४७ तास विश्रांतीही घेतली नाही.
- या कार्यक्रमामुळे बेस्टचे नाव देशपातळीवर पोहोचल्याने
निलांबरी घेऊन पुन्हा मुंबईत आलेल्या चालकांचे देवनार व वडाळे डेपोतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वागत केले.
- बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांनीही दोन्ही चालकांना पत्र देऊन त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
- चौघुले हे २५ वर्षे व तोडकर २३
वर्षे बेस्टमध्ये सेवा देत असून, विनाअपघात बस चालविल्याबद्दल त्यांना अनेकवेळा गौरविण्यात
आले आहे.