Join us

शिवसेना-भाजपात श्रेयावरून ‘बेस्ट’ स्पर्धा

By admin | Published: May 03, 2016 1:24 AM

बेस्टचे ५२ बसमार्ग बंद केल्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर प्रशासनाने आज या निर्णयाला स्थगिती दिली़ लवकरच हे बसमार्ग पूर्ववत करण्याचे आश्वासन महाव्यवस्थापक जगदीश पाटील

मुंबई : बेस्टचे ५२ बसमार्ग बंद केल्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर प्रशासनाने आज या निर्णयाला स्थगिती दिली़ लवकरच हे बसमार्ग पूर्ववत करण्याचे आश्वासन महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी दिले आहे़ मात्र हे बसमार्ग पुन्हा सुरू करण्याचे श्रेय घेण्यावरून शिवसेना-भाजपामध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे़५२ बसमार्ग १ मेपासून बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला़ मात्र या निर्णयाला सर्वच स्तरांतून तीव्र विरोध होऊ लागला़ बेस्ट समितीवर भाजपाचा अध्यक्ष असताना मोठ्या प्रमाणात बसमार्ग बंद केल्याचे शिवसेनेने भांडवल केले़ हा निर्णय रद्द होण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी बेस्ट उपक्रमाच्या मुख्यालयात जाऊन महाव्यवस्थापकांना घेराव घातला़ त्यानुसार महाव्यवस्थापकांनी तत्काळ हा निर्णय रद्द केल्याचे श्रेय शिवसेनेने घेतले आहे़ मात्र बेस्ट समितीचे अध्यक्ष मोहन मिठबावकर हे गेले दोन दिवस प्रशासनाबरोबर चर्चा करीत आहेत़ हे बसमार्ग पूर्ववत करण्याचा आराखडा महाव्यवस्थापक उद्या अध्यक्षांना सादर करणार आहेत़ त्यामुळे शिवसेनेने यात राजकारण करू नये, असा इशाराच भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी मित्रपक्षाला दिला आहे़ (प्रतिनिधी)बसमार्ग पूर्ववत करणारअत्यल्प उत्पन्न व प्रवाशांचा प्रतिसाद नसलेले ५२ बसमार्ग रद्द करण्यात आले आहेत़ मात्र प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन बंद केलेले बसमार्ग टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत़ वाहक व चालकांच्या कामांच्या वेळापत्रकानुसार बसमार्गांची यादी तयार होत असते़ त्यामुळे याचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय होईल, असे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले़बेस्ट समितीचे अध्यक्षपद भाजपाकडे येताच तिकिटांचे भाडे व वीज दरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला़ गेली अनेक वर्षे ही समिती शिवसेनेकडे असताना भाजपाने दोनच दिवसांत मुंबईकरांचा प्रश्न सोडविला, अशी जाहिरातबाजीही सुरू झाली़ भाजपाच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडे ही संधी चालून आली़ ५२ बसमार्ग रद्द करून भाजपाने मुंबईकर प्रवाशांचे हाल केल्याचा आरोप शिवसेनेकडून सुरू झाला़ शिवसेनेची खेळीप्रत्येक चार महिन्यांनी बेस्टमधील बसमार्गांमध्ये बदल होत असतो़ तोट्यातील बसमार्ग बंद करणे आणि नफ्यातील बसमार्गांवर बस फेऱ्या वाढविण्यात येत असतात़ ही प्रक्रिया एप्रिलमध्ये होणे अपेक्षित होती़ मात्र बेस्ट समिती भाजपाच्या ताब्यात जाणार असल्याने मित्रपक्षाची गोची करण्यासाठी शिवसेनेने बसमार्गांमधील बदल लांबणीवर टाकले़ भाजपाचा टोलाबसमार्गांमधील बदलाचा निर्णय वेळीच घेतला असता, तर शिवसेनेवर आज असे आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असा टोला कोटक यांनी लगावला आहे़