बेस्ट वाहकाला मारहाण, तिकीट मशिनही फोडले, गोरेगाव येथील घटना : प्रवाशावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:26 IST2025-01-02T14:25:53+5:302025-01-02T14:26:09+5:30
तक्रारदार बेस्ट वाहक सतीश पालवे हे सोमवारी रात्री गोरेगाव स्टेशनवरून वरळी आगार येथे निघालेल्या बस क्रमांक सी ३३ वर ड्युटीवर होते...

बेस्ट वाहकाला मारहाण, तिकीट मशिनही फोडले, गोरेगाव येथील घटना : प्रवाशावर गुन्हा
मुंबई : बेस्ट बसच्या दरवाजाला लटकताना हटकल्याच्या रागातून वाहकाला मारहाण करण्यासह त्याच्याकडील चलो कंपनीचे तिकीट मशिन प्रवाशाने फोडल्याची घटना गोरेगाव पश्चिम येथे सोमवारी घडली. याप्रकरणी प्रवासी मनोज परिडा (४४) याच्याविरोधात गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार बेस्ट वाहक सतीश पालवे हे सोमवारी रात्री गोरेगाव स्टेशनवरून वरळी आगार येथे निघालेल्या बस क्रमांक सी ३३ वर ड्युटीवर होते. ही बस गोरेगाव पश्चिमेतील जवाहरनगर थांब्यावर येताच एक अनोळखी व्यक्ती बसच्या दरवाजाला बाहेरच्या बाजूने पकडून दुसऱ्या हातात मोबाइलवर बोलत असल्याचे त्यांनी पाहिले. पालवे यांनी त्याला बसमध्ये येऊन तिकीट काढायला सांगितले. त्यामुळे त्याने पालवे यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ सुरू केली. पालवे यांनी समजूत काढूनही तो त्यांच्या अंगावर धावून जाऊ लागला.
डाव्या हाताला दुखापत
पालवे यांनी चालक अमोल तांबे यांना बस थांबवण्यास सांगितली. तोपर्यंत बस गोरेगाव आगारात पोहोचली आणि पालवे यांना प्रवाशाने मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्या हातातील तिकीट मशीन बसच्या सीटवर आढळून त्याचे नुकसान केले. अन्य प्रवाशांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. तर, पालवे यांनी पोलिसांकडे मदत मागितली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्याला गोरेगाव पोलिस ठाण्यात नेले. पालवे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी तक्रार दिली. त्याआधारे बीएनएस कायद्याचे कलम ३५२,३२४(३),१३२ आणि १२१ (१) अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.