Join us

अशीही बनवाबनवी! बेस्ट कंडक्टरची शक्कल, तिकिटाऐवजी दिली झेरॉक्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:26 AM

चौकशीत दोषी आढळल्याने केले निलंबन.

मुंबई :बेस्टच्या कंडक्टरने तिकिटाचे पैसे लाटण्यासाठी अधिकृत तिकिटांबरोबर प्रवाशांना भलतीच प्रिंट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आठ महिन्यांनी चौकशीअंती ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात बस वाहकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. राजेंद्र खुंटे असे बेस्टच्या कंडक्टरचे नाव आहे. खुंटेची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीत दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बस निरीक्षक अशोक भाऊ चौरे (५६) यांच्या तक्रारीनुसार, देवनार बस आगार मुंबई येथे कार्यरत असलेले राजेंद्र आबुराव खुंटे यांच्यावर हे २० एप्रिल २०२३ रोजी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास वाशी बिटअंतर्गत देवनार आगार मुंबई ते कळंबोली प्रवास करणाऱ्या बसमधील प्रवाशांचे तिकीट तपासणीच्या कामासाठी हजर झाले.  सकाळी पावणे पाच वाजता बेस्ट बस वाशी हायवे बस थांब्यावर आली. ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिकीट तपासण्यास सुरुवात केली. 

अशीही हेराफेरी :

याप्रकरणी मंगळवारी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, ट्रॉम्बे पोलिस अधिक तपास करत आहे. ते अनेक दिवसापासून अधिकृत तिकिटामध्ये अशाप्रकारे कलेक्शन तिकिटाच्या झेरॉक्स केलेले तिकीट प्रवाशांना देत बेस्ट प्रशासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा संशय आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

एका वृद्ध महिला प्रवाशाकडील तिकीट तपासताच त्यांना संशय आला. खुंटेने महिलेला २० रुपयांचे अधिकृत तिकीट दिले. मात्र, मला पहिल्यांदा एक तिकीट दिले आहे. कलेक्शन रिपोर्टच्या तिकिटाचे प्रिंट आपले नसल्याचे सांगितले. कलेक्शन रिपोर्टमधील तिकीट २५ रुपयांचे होते. त्यांच्याकडे चौकशी करताच खुंटे यांनीच ते तिकीट दिल्याचे सांगताच, त्यांनी दोन्ही प्रवाशांना महाराष्ट्र नगर, ट्रॉम्बे येथील बस स्टॉपवर उतरवले. तिकीट, रोकड ताब्यात घेत चौकशी करताच त्यांच्याकडे तिकिटाची ११२ रुपयांची जास्तीची रक्कम मिळून आली. 

टॅग्स :मुंबईबेस्ट