लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘बेस्ट’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक चर्चा केली, असे सांगितल्यानंतरही ‘बेस्ट’च्या विविध आगारांतील अनेक कंत्राटी कर्मचारी बुधवारी कामावर गेलेच नाहीत. मात्र सायंकाळी १०० टक्के गाड्या सेवेत उतरल्याचे बेस्टने सांगितले. हा सगळा ‘बेस्ट’ गाेंधळ संपायचे नाव घेत नाही. दिवसभर कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे व गोंधळाचे वातावरण हाेते.
विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर आंदोलन पुकारणाऱ्या काही कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून संप मागे घ्या, असे आवाहन करण्यात आल्यानंतर काही कंत्राटी कामगार तत्काळ सेवेत रुजू झाले. तर जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही, असा पवित्रा काही संपकऱ्यांनी घेतल्याने बुधवारी काही कामगार कामावर न गेल्यामुळे बस गाड्या आगारातच उभ्या होत्या.
एसटीच्या २१२ गाड्याबेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल होऊ नयेत म्हणून गेले काही दिवस राज्य परिवहन महामंडळाच्या बेस्टच्या मदतीला आल्या होत्या. आजही एसटीच्या २१२ गाड्यांच्या माध्यमातून मुंबईकरांना सेवा दिली जात होती.
संघटनेशिवाय सुरू झालेल्या संपाला लेटरपॅड कुणी उपलब्ध करून दिले?संपकरी कामगारांसोबत चर्चा केल्यानंतर कुठेतरी या कामगारांची विविध संघटनांकडून दिशाभूल केली गेली आहे. काल संध्याकाळी अचानक उपोषण, आंदोलन मागे घेतले गेले. या संपाची ज्यांनी सुरुवात केली त्या खजूरकर कुटुंबाने शिवसेनेशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र राज्य कामगार सेना युनियनच्या लेटरहेडवर आझाद पोलिस ठाण्याला लिखित अर्ज देत संपाची सांगता केली. त्यामुळे जर का संघटनेचा संप नव्हता तर हे लेटरहेड कुठून आले तसेच संघटनेशिवाय सुरू झालेला संप संघटनेमुळे कसा काय संपला. -केतन नाईक, उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना
येथे कर्मचारी आलेच नाहीगोरेगाव, सांताक्रूझ, मालवणी, घाटकोपर ३०४० गाड्यांपैकी २९६२ गाड्या रस्त्यावर बेस्टच्या ३०४० एकूण गाड्यांपैकी २९६२ गाड्या सकाळी १० वाजेपर्यंत धावत होत्या. त्यानंतर सायंकाळी १०० टक्के गाड्या रस्त्यावर उतरवल्याचे ‘बेस्ट’चे जनसंपर्क अधिकारी सुरेश वैद्य यांनी सांगितले.