मुंबईतील परिवहन सेवा बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी BEST Contract Workers Strike पुकारलेला संप अखेर सात दिवसांनी मागे घेण्यात आला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी सांगितलं. कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेस्टच्या पेरोलवर घेणं, पगारवाढ या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिल्याचं संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितलं. शिंदे यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
आम्हाला बेस्टच्या सेवेत कायम करून घ्या, ‘समान काम समान वेतन’ या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप सुरू राहणार, असा पवित्रा संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतला होता. सहा दिवसांपासून कंत्राटी कामगारांचा संप सुरू होता. या आंदोलनाला संघर्ष कामगार कर्मचारी युनियननेही पाठिंबा दिला होता. सोमवारी दादर येथे मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार, असे युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले होते.
तोडग्यासाठी पालकमंत्र्यांची मध्यस्थीमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संपात मध्यस्थी केली. २४ ते ४८ तासांत हा संप मिटेल, अशी ग्वाही दिली होती. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे सांगत लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर येण्याचे आवाहन लोढा यांनी केले होते. मुंबईकरांना या संपामुळे त्रास झाल्याचेही त्यांनी मान्य केले.