लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बेस्ट प्रशासनाच्या वीज देयक भरणा केंद्रांवरील गर्दी कमी करण्यासाठी विद्युत पुरवठा उपक्रमाकडून ग्राहकांना आॅनलाइन पद्धतीने वीज देयक भरण्याचे आवाहन केले जाते. मात्र आॅनलाइन पद्धतीने वीज देयक भरताना इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सर्व्हिस (ईसीएस) या सेवेचा वापर करण्यासाठी भायखळ्यातील वीज ग्राहकांना प्रचंड धावाधाव करावी लागत आहे. या ठिकाणी माहिती फलक लावण्याची मागणी युवा ऊर्जा फाउंडेशनने केली आहे.बेस्टच्या भायखळा पूर्वेकडील घोडपदेवमधील वीज देयक भरणा केंद्रावर ईसीएस सेवा सुरू करण्यासाठी अर्जाचे वाटप केले जाते. हे अर्ज मुंबई सेंट्रल येथील ग्राहक सेवा ‘ई’ विभाग कार्यालयात सादर करण्याचा सल्ला दिला जातो. त्याआधी ग्राहकांना या अर्जावर वीज देयक भरणा करणाऱ्या बँकेतील सक्षम अधिकाऱ्यांची सही व स्टँप आणावे लागतात. इतका द्राविडी प्राणायाम केल्यानंतर मुंबई सेंट्रल येथील ‘ई’ विभाग कार्यालयाकडून ईसीएस अर्जाचा स्वीकार करण्यास नकार दिला जात आहे. ईसीएस सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांना दादर येथील कार्यालयात पाठवले जात आहे. बेस्ट प्रशासनाने ग्राहकांना अयोग्य माहिती देणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी फाउंडेशनने केली आहे.फाउंडेशनचे आशिष चव्हाण म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना या प्रकाराने सर्वाधिक त्रास होत आहे. कर्मचाऱ्यांकडून चुकीचे मार्गदर्शन केल्याने ग्राहकांना मुंबई सेंट्रल आणि दादरच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई सेंट्रल येथील कर्मचारीही वीज देयक भरणा केंद्रांना सूचना देण्याऐवजी ग्राहकांसोबत वादावादी करण्यात धन्यता मानत आहेत. दादर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सर्व वीज देयक भरणा केंद्रांना यासंदर्भातील माहिती दिल्याचे सांगितले. मात्र केंद्रावर पैसे जमा करणारे कर्मचारी असल्याने हा गोंधळ उडत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व वीज देयक भरणा केंद्रांबाहेर माहिती फलक लावल्यास हा गोंधळ टाळता येईल, असे चव्हाण यांनी सांगितले़
ईसीएस सेवेसाठी बेस्ट ग्राहकांची धावाधाव
By admin | Published: June 21, 2017 3:52 AM